17 November 2017

News Flash

मासे खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

ताजे मासे कसे ओळखाल?

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 12:31 PM

प्रातिनिधिक छायाचित्र

‘आखाड’ म्हणजे मांसाहार आणि मासे यांच्यावर ताव मारण्याचे बेतच बेत. मग कधी एकदा रविवार येतोय आणि कुटुंबाबरोबर किंवा मित्रमंडळींसोबत फक्कड बेत जमतोय याचीच प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात असतो. आता या दिवसात पावसाळा असल्याने मासे खरेदी करताना आणि ते बनवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी घेतल्यास आरोग्यासाठी ते निश्चितच फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत. मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत.

• पापलेट – रंगाने सफेद व चमकदार दिसणारे पापलेट ताजे असतात. पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ते ताजे असतात, लाल पाणी आल्यास शिळे असतात असे समजावे. तसेच पापलेट शिळे व खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.

• सुरमई, रावस, हलवा – विकत घेण्यापूर्वी घट्ट बघून घ्यावे. या माशांचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर भाग दिसल्यास मासे ताजे समजावेत व काळसर दिसल्यास ते शिळे व खराब आहेत असे समजावे.

• कोळंबी – कोळंबी लाल व पांढरी अशी दोन प्रकारची येते. लाल कोळंबीमध्ये काळसर लाल व पांढऱ्या हिरवट रंगाची कोळंबी ताजी असते. ही कोळंबी रंगाने किंचितशी केशरी रंगाची होऊ लागली की ती शिळी व खराब असल्याचे समजावे. तसेच शिळ्या व खराब कोळंबीची डोकी तुटलेली असतात, साल मऊ पडलेले असते व घाण वासही येतो. ताजी कोळंबी घट्ट व कडक सालीची असते. पांढरी कोळंबी पचायला हलकी व जास्त चांगली असते. पांढरी कोळंबी ही पांढऱ्या स्वच्छ रंगाची, घट्ट व चमकदार असते. याला पिवळसर काळा रंग येऊ लागला तर ती शिळी व खराब होत आली आहे असे समजावे. तसेच डोकी तुटू लागलेली व डोक्याला काळा रंग येऊ लागलेली व साल मऊ पडलेली कोळंबी शिळी व खराब असते त्यामुळे ती अजिबात खरेदी करु नये.

पावसाळयात ‘ही’ काळजी घ्यायलाच हवी

• बांगडे आणि बोंबील – काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे आणि पांढऱ्या स्वच्छ रंगाचे बोंबील ताजे असतात. तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे आणि बोंबील ताजे असतात. हे दोन्ही मासे शिळे व खराब झाल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो. हे मासे दाबून पाहिल्यावर खड्डा पडत असेल तर ते शिळे आहेत असे समजावे.

• ओला जवळा – ओला जवळा घेताना पांढऱ्या स्वच्छ रंगाचा ताजा घ्यावा.

• शिंपल्या (तिसऱ्या) – शिंपल्या घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात, किंवा जिवंत असणाऱ्या, तोंडे उघडझाप करणाऱ्या घ्याव्यात. शिंपल्या खराब व शिळ्या झाल्या की त्यांची तोंडे उघडी पडलेली असतात मिटत नाहीत.

• कालवे – कालवे घेताना पांढऱ्या रंगाचे, मोठे व ताजे पाण्यात ठेवलेले घ्यावेत. छोटे कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त असते. मोठे कालवे पटकन साफ करता येतात.

• चिंबोरी/ खेकडे – चिंबोऱ्या घेताना काळसर रंगाच्या, जिवंत व चालणाऱ्या घ्याव्यात. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खायाला फारसे काही मिळत नाही.

‘ही’ आहेत कमी वयात होणाऱ्या हृदयरोगाची कारणे

First Published on July 17, 2017 12:30 pm

Web Title: take care while purchasing fish in rainy season freshness