आपलं स्वत:च घर असावं असं प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी दोघेही भरपूर कष्ट करतात. पण कितीही पैसे कमावले तरी मोठ्या शहरामध्ये आपल्या स्वप्नातील घर घ्यायचे असल्यास गृहकर्ज घ्यावे लागते. कर्ज घेणे ही एखाद्या कुटुंबाच्या दृष्टीने नक्कीच मोठे आव्हान असते. हे आव्हान पेलताना आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. यामध्ये कोणत्या बँकेचे कर्ज घ्यावे, ते घेताना कोणत्या गोष्टी तपासून पाहायला हव्यात, या कर्जामुळे आपल्याला करामध्ये किती सूट मिळू शकते, त्याच्या कागदपत्रांची तजवीज कशी करावी या गोष्टी माहिती करुन घ्यायलाच हव्यात. पाहूयात गृहकर्जाविषयीच्या अशाच काही गोष्टी…

१. घराच्या कायदेशीरबाबींची शहानिशा करा – तुम्ही घेत असलेले घर नक्की करायच्या आधी घराच्या कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करुन घ्या. बिल्डरच्या आधीच्या कामाचे रेकॉर्ड, त्याची प्रतिष्ठा यांबाबत माहिती घ्या. रेराची मान्यता असलेल्या प्रकल्पांबाबत रेराच्या वेबसाइटवर माहिती घ्या. घर घेण्याआधी त्याची कागदपत्रे चांगल्या वकीलाला दाखवून घ्या.

२. घर आपल्याला परवडणारे आहे का हे तपासा – कर्ज घेतल्यानंतर आपल्याला महिन्याला किती रक्कम बँकेत भरावी लागणार आहे याचे नीट गणित मांडा. ही रक्कम कर्जाची रक्कम आणि किती वर्षांसाठी कर्ज घेतले त्यावर अवलंबून असते. त्यामुळे या गोष्टींचे योग्य ते नियोजन करुन मगच कर्ज घ्यायचे निश्चित करा.

३. व्याजदर – गृहकर्जासाठी प्रत्येक बँकेचा व्याजदर कमी अधिक फरकाने वेगवेगळा असतो. तसेच बँकेकडून देण्यात येणाऱ्या सुविधाही वेगळ्या असतात. यासाठी वेगवेगळ्या बँकांमध्ये व्याजदराची चौकशी करुन मगच कोणत्या बँकेतून घ्यायचे ते नक्की करा.

४. व्याजदराशिवाय इतर शुल्क – गृहकर्ज घेताना व्याजाशिवाय कर्जावरील प्रक्रिया शुल्क, विमा असे काही शुल्क आपल्याला बँकेत भरावे लागते. याची योग्य ती माहिती घ्या. ज्याठिकाणी हा खर्च कमी असेल तिथून कर्ज घेणे फायदेशीर ठरेल.

५. कर्जाचा कालावधी – गृहकर्ज साधारणपणे २० वर्षांसाठी दिले जाते. मात्र काही बँका ही मर्यादा ३० वर्षांपर्यंतही वाढवताना दिसतात. ही वर्षांची मर्यादा कर्ज घेणाऱ्याच्या निवृत्तीच्या वयावरही अवलंबून असते. काहीवेळा स्वत:चा व्यवसाय असणाऱ्यांसाठी ही मर्यादा ६५ वर्षांपर्यंत असते.

६. एजंटशिवाय व्यवहार करा – कर्ज घेताना तुम्ही थेट बँकेशी संपर्क करुन ते घेऊ शकता. त्यासाठी एजंटची आवश्यकता नसते. त्यामुळे कर्ज घेताना थेट बँकेशी संपर्क करा आणि सर्व व्यवहार शक्यतो चेकने करा. त्यामुळे त्याचे योग्य ते रेकॉर्ड राहते.

७. करासाठी मिळणारे फायदे- तुम्ही घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाचा भाग हा तुमच्याकडे येणाऱ्या मिळकतीतून वजा होतो. त्यामुळे गृहकर्जाचा करामध्ये फायदा होतो. याची वेळीच माहिती घेतल्यास कर भरणा कमी होतो.

८. शासकीय योजनांची माहिती घ्या – सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गात काही खास योजना जाहीर केल्या आहेत. पहिल्यांदाच घर घेणारे लोक त्यासाठी पात्र असतात. मात्र त्यासाठी असणारे नियम माहिती करुन घेऊन त्यासाठी अर्ज करावा.

९. कागदपत्रे – कर्ज घेताना आपण देत असलेली सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने भरली आहेत की नाही हे तपासा. तुम्ही देत असलेल्या चेकवरही सर्व योग्य ती माहिती आहे की नाही ते तपासा.

१०. गृहकर्जाचा विमा काढा – गृहकर्ज घेत असताना बँका तुम्हाला विमा घेण्यासाठी सांगतात. त्यावेळी ही किंमत बोजा वाटू शकते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाले तर हा विमा अतिशय उपयुक्त ठरतो.