मोबाईल ग्राहकांना आता कॉल करण्यासाठी आणि इंटरनेटचा वापर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. कारण, व्होडाफोन- आयडिया, एअरटेल आणि रिलायन्स जिओ या तिन्ही आघाडीच्या कंपन्यांनी दरवाढ लागू केली आहे. 2016 नंतर प्रथमच या कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली आहे. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वाधिक दरवाढ असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची टॅरिफ दरवाढ तीन डिसेंबरपासूनच लागू झाली होती, तर आजपासून (दि.6) रिलायंस जिओचीही दरवाढ लागू झालीये. तिन्ही कंपन्यांनी त्यांच्या जुन्या प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले आहेत. तसेच या प्लॅन्समध्ये मिळणारे फायदे देखील आता कमी-अधिक मिळणार आहेत. मोबाइल वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री लागणार असली तरी एअरेटल, व्होडाफोन-आयडिया आणि जिओ यांचे असे काही प्लॅन्स आहेत, ज्याद्वारे युजर्सना बेस्ट प्रीपेड प्लॅन 200 रुपयांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

आणखी वाचा- आजपासून Jio ची दरवाढ, जाणून घ्या सर्व नव्या प्लॅन्सची माहिती

जाणून घेऊया 200 रुपयांपर्यंतचे सर्वोत्तम प्लॅन्स – 
200 रुपयांपर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन रिलायंस जिओचा आहे. जिओने 129 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे.
28 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. जिओ ते जिओ नेटवर्कवर कॉलिंग मोफत आहे. जिओच्या तुलनेत एअरटेलचा 148 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्येही 28 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. तसेच एअरटेल ते एअरटेल कॉलिंग मोफत आहे. तर व्होडाफोनचाही 149 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये एअरटेलच्या प्लॅन प्रमाणेच सर्व सुविधा मिळतात.  म्हणजेच, एअरटेलच्या 148 आणि व्होडाफोनच्या 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा जिओच्या 129 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांची जवळपास 15 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.