टाटा मोटर्सने प्रीमियम हॅचबॅक कार Tata Altroz भारतात लाँच केली आहे. या कारची थेट टक्कर मारुती सुझुकीच्या Baleno आणि ह्युंदाई Elite i20 यांसारख्या गाड्यांशी असेल. Tata Altroz ही कार कंपनीने 3 डिसेंबर रोजी सादर केली होती आणि काही दिवसांपूर्वीच या कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार मिळाले होते. क्रॅश टेस्टवरुन ही कार म्हणजे भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक कार असल्याचं स्पष्ट होतं, असं कंपनीने म्हटलंय. याशिवाय कंपनीने BS6 इंजिनसह तीन फेसलिफ्ट मॉडेल टाटा नेक्सॉन, टाटा टिआगो आणि टाटा टिगोर फेसलिफ्ट लाँच केल्या.

इंजिन –
ही कार दोन इंजिन पर्यायांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यात एक टिआगोचं 1.2-लीटर पेट्रोल इंजिन, तर दुसरं नेक्सॉनचं 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन 85 bhp ऊर्जा आणि 113 Nm टॉर्क , तर डिझेल इंजिन 89 bhp ऊर्जा आणि 200 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड असून ही कार टाटाची नवीन इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेज सपोर्ट करते.

फीचर्स –
दरवाजे 90-डिग्रीपेक्षा जास्त उघडणारी ही कार टाटाच्या नव्या ALFA डिझाइनवर काम करते. कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्टसह 7-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. याशिवाय प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, फ्रंट आणि रिअर फॉग लॅम्प आणि रिअर डिफॉगर यांसारखे फीचर्स आहेत.

किंमत (एक्स-शोरुम) – ही कार पेट्रोल आणि डिझेलचे दोन इंजिन पर्याय आणि 10 व्हेरिअंटमध्ये (XE, XM, XT, XZ, XZO) उपलब्ध असेल. पेट्रोल इंजिनच्या बेसिक व्हेरिअंटची(XE) किंमत 5.29 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंटची (XZO) किंमत 7.69 लाख रुपये आहे. तर, डिझेल इंजिनच्या बेसिक व्हेरिअंटची(XE)किंमत 6.99 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंटची (XZO)किंमत 9.29 लाख रुपये आहे.