16 December 2018

News Flash

लाँचिंगपूर्वीच Tata Harrier च्या किंमतीचा खुलासा

Harrier SUV च्या ऑन-रोड किंमतीचा खुलासा

घोषणा झाल्यापासूनच Tata Motors ची नवी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Harrier बरीच चर्चेत आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात ही शानदार एसयूव्ही लाँच होण्याची शक्यता आहे, मात्र त्याआधीच या कारच्या किंमतीबाबत खुलासा झाला आहे. टाटा मोटर्सने ट्विटरद्वारे Harrier SUV च्या ऑन-रोड किंमतीचा खुलासा केला आहे.


या ट्विटनुसार, ‘नव्या एसयूव्हीची किंमत 16 ते 21 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. या कारच्या बेसिक व्हेरिअंटची (एक्सई) किंमत 16 लाख रुपये, तर टॉप व्हेरिअंटची (एक्सझेड) किंमत 21 लाख रुपये असू शकते. ही ऑन-रोड किंमत असून यामध्ये रजिस्ट्रेशन खर्च, विमा आणि इतर करांचा समावेश नाहीये. तरीही लॉंचिंगच्या वेळीच नेमकी किती किंमत असेल हे स्पष्ट केलं जाईल’, असं टाटा मोटर्सने ट्विटमध्ये म्हटलंय. किंमतीबाबतची माहिती कंपनीने ऑक्टोबर महिन्यातच दिली होती, मात्र काल(दि.5) कंपनीने या नव्या एसयूव्हीचे स्पेसिफिकेशन्स, डायमेंशन आणि फिचर्सबाबत माहिती शेअर केल्यानंतर पुन्हा एकदा या कारच्या किंमतींबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय बाजारात या एसयूव्हीमुळे Hyundai Creta, Renault Captur आणि Jeep Compass यांसारख्या गाड्यांना तगडी टक्कर मिळेल असं बोललं जात आहे.

जाणून घेऊया हॅरियर एसयूव्हीची खासियत –
टाटा हॅरियर नव्या OMEGARC प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा मोटर्स आणि जॅग्वार लँड रोव्हर यांनी ही कार डेव्हलप केलीये. गाडीची लांबी 4598 mm, रुंदी 1894 mm आणि उंची 1706 mm आहे, तर व्हिलबेस 2741 mm आणि ग्राउंड क्लिअरंस 205 mm आहे. या दमदार कारमध्ये तुम्हाला 50-लीटर क्षमतेचा फ्युअल टँक मिळेल. याशिवाय रेडियल टायरसोबत 17-इंच अॅलॉय व्हिल्ज असेल. या कारमध्ये 2.0-लीटर क्रायोटेक डिझेल इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 3750 rpm वर 138 bhp पावर आणि 1750-2500 rpm वर 350 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. चार सिलिंडर मोटर 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणारी ही एसयूव्ही सध्या पेट्रोल इंजिन, ऑटोमॅटिक ट्रांसमिशन आणि ऑल व्हिल ड्राइव व्हर्जनमध्ये नाही मिळणार. सिटी, इको आणि स्पोर्ट्स अशाप्रकारच्या तीन ड्रायव्हिंग मोड्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये नॉर्मल, रफ आणि वेट मोड्ससह टेरेन रिस्पॉन्स सिस्टिमही उपलब्ध असेल. हॅरियरच्या समोरील बाजूस मॅकफर्सन स्ट्रट्ससोबत इंडिपेंडेंट फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूला सेमी-इंडिपेंडेंट ट्विस्ट ब्लेड सेटअप आहे. ब्रेकिंगबाबत सांगायचं झाल्यास याच्या पुढील बाजूला डिस्क आणि मागील बाजूला ट्रम ब्रेक आहेत.
फिचर्स –
या एसयूव्हीमध्ये अनेक शानदार फिचर्स आहेत. एकूण चार व्हेरिअंट्समध्ये ही कार उपलब्ध असेल. यामध्ये एक्सई, एक्सएम, एक्सटी आणि एक्सझेडचा समावेश आहे. यामध्ये फॉलो-मी-होम फंक्शनसह प्रोजेक्टर लेंस हेडलॅम्प्स, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट्स, फॉग लॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि आउट साइड व्ह्यू मिररमध्ये टर्न इंडिकेटर्स आहेत. कॅबिन फॉक्स वुड इंसर्ट्ससोबत ब्लॅक आणि ब्राउन कलर थीम आहे. यामध्ये प्रीमियर फॅब्रिक आणि लेदर अपहोल्स्ट्रीचा पर्याय मिळेल. हॅरियरमध्ये पूश बटन स्टार्ट-स्टॉप, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हिल, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि कूल्ड ग्लवबॉक्स आहे. 8.8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम कारमध्ये आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टिम अॅपल कार-प्ले, अँन्ड्रॉइड ऑटो, मिरर लिंक आणि नेव्हिगेशन सपोर्टसह आहे. टॉप व्हेरिअंट्समध्ये 9-स्पीकर जेबीएल ऑडियो सिस्टिम मिळेल. यामध्ये सर्व अत्याधुनिक सुरक्षाविषयक फिचर्सचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये सिटबेल्ट रिमाइंडरसह 3-पॉइंट सिटबेल्ट्स देण्यात आले आहेत. एसयूव्हीमध्ये 6-एअरबॅग्स, ISOFIX सिट्स, इबीडी, एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोलसह ईएसपी, ऑफ रोड एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डीसेंट कंट्रोल, रोलओव्हर मिटिगेशन आणि ब्रेक असिस्ट यांसारखे अनेक फिचर्स आहेत. थर्मिस्टो गोल्ड, कॅलिस्टो कॉपर, एरियल सिल्व्हर, टेलिस्टो ग्रे आणि ऑर्कस व्हाइट या कलर्समध्ये ही कार खरेदी करता येईल. जानेवारी 2019 मध्ये ही कार लाँच होणार आहे.

First Published on December 5, 2018 5:59 pm

Web Title: tata harrier price range confirmed officialy