टाटा मोटर्सच्या महत्त्वाकांक्षी नॅनो कारचा प्रवास आता अखेरच्या वळणावर आला आहे. कारण, भारतातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा नॅनो कारचं टाटा मोटर्सने गेल्या वर्षी उत्पादनच घेतलेलं नाही. याशिवाय गेल्या वर्षी केवळ एकच टाटा नॅनो कार विकली गेल्याची आश्चर्यकारक माहितीही पुढे आली आहे.

वाहन उद्योगातील मंदी व ई-वाहनांच्या निमित्ताने या क्षेत्रात होऊ घातलेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर नॅनो कालबाह्य झाल्याचे चित्र आहे. मात्र, अद्याप कंपनीने अधिकृतपणे या कारला निवृत्त केलेलं नाही. गेल्यावर्षी डिसेंबर 2019 पर्यंत टाटा मोटर्सने नॅनोचं प्रोडक्शन घेतलंच नाही, तर फेब्रुवारी महिन्यात केवळ एक नॅनो विकली गेली. म्हणजे वर्षभरात अवघ्या एकाच कारची विक्री झाली. तुलनेत 2018 मध्ये 71 नॅनोची निर्मिती करण्यात आली होती आणि 54 नॅनो विकल्या होत्या. टाटा मोटर्सने शेअर बाजाराला गेल्यावर्षीच्या उलाढालीबाबतची माहिती दिली. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.

आणखी वाचा – Tata ची Harrier SUV झाली महाग, जाणून घ्या नवी किंमत

BS6 उत्सर्जन मानकामुळे कंपनीने कारचं उत्पादन करणं बंद केल्याचं बोललं जात आहे. या कारची किंमत सध्या २.९७ लाख रुपये एवढी आहे. जर नव्या मानकानुसार या कारमध्ये बदल केला तर या कारची किंमत वाढेल. त्यामुळे कंपनी या कारचं प्रोडक्शन घेतल नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या स्वप्नातल्या टाटा नॅनोचा लवकरच गाशा गुंडाळला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.