रिलायन्स जिओनं 15 ऑगस्ट पासून ब्रॉडबँड सेवेची घोषणा केल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांमध्ये टाटा स्कायनेही ब्रॉडबँड सेवा सादर करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, मीरा-भाइंदर, नवी दिल्ली, गुरगाव, नॉयडा, गाझियाबाद, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई व बेंगळुर या 12 शहरांमध्ये टाटा स्कायनं ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सादर करत असल्याचे जाहीर केले आहे.

एका महिन्यापासून ते 12 महिन्यांपर्यंतच्या विविध मुदतीचे हे प्लॅन्स असून साधारणपणे 999 रुपये प्रति महिना, अमर्याद इंटरनेट व स्पीड 5 एमबीपीएस इथपासून हे प्लॅन सुरू आहेत. दिलेला कोटा संपला की त्यानंतर इंटरनेटचा वेग एक एमबीपीएस इतका कमी होणार आहे. पाच एमबीपीएस, 10 एमबीपीएस, 30 एमबीपीएस 50 एमबीपीएस व 100 एमबीपीएस असे विविध स्पीड निवडण्याची मुभा ग्राहकाला असेल. डेटा लिमिट किती असेल, किती डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होईल आदीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

टाटा स्कायच्या एका महिन्याच्या प्लॅनसाठी 5 एमबीपीएस, 10 एमबीपीएस, 30 एमबीपीएस, 50 एमबीपीएस व 100 एमबीपीएस स्पीडसाठी अनुक्रमे 999 रुपये, 1,150 रुपये, 1,500 रुपये, 1,800 रुपये व 2,500 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या दोन प्लॅन्समध्ये 60 जीबी व 125 जीबीची मर्यादा आहे तर अन्य प्लॅन्समध्ये अमर्याद डेटा मिळणार आहे. ग्राहकांना जोडणीसाठी 1,200 रुपये भरावे लागणार असून त्यासोबत राऊटर मोफत देण्यात येणार आहे. टाटा स्कायने याचप्रमाणे तीन महिन्यांचे व वर्षाचे प्लॅन जाहीर केले आहेत.