करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाले आहे. जनतेला अत्यावश्यक बाबींची समस्या जाणवू नये यासाठी सरकारी उपाययोजनांव्यतिरिक्त खासगी कंपन्याही आपल्या सेवांमध्ये आवश्यक बदल करत आहेत. अशातच, आता DTH कंपनी Tata Sky नेही रिचार्ज न केल्याने ज्या युजर्सचे अकाउंट बंद झाले आहे, अशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. लॉकडाउनमुळे जे युजर रिचार्ज करु शकले नाहीत, अशांसाठी कंपनीने ही ऑफर आणलीये. याशिवाय कंपनीने आधीपासून सब्सक्राइब केलेल्यांसाठी २१ दिवसांसाठी आपली ‘फिटनेस व्हॅल्यू अॅडेड’ ही सेवा मोफत केली आहे.

या ऑफरनुसार कंपनी युजरला सात दिवस रिचार्ज न करता सर्व सेवा उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी सात दिवसांचा बॅलेंस कंपनीकडून ग्राहकाच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाईल. सात दिवसांच्या क्रेडिट बॅलेंससाठी युजरला 080-61999922 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. मिस कॉल दिल्यानंतर चार तासांत युजरच्या अकाउंटमध्ये सात दिवसांचा बॅलेंस क्रेडिट केला जाईल. पण, ही सेवा मोफत नसेल.

कारण, आठव्या दिवशी युजरच्या अकाउंटमधून सात दिवसांच्या क्रेडिट बॅलेंसचे पैसे आपोआप कापले जातील असे कंपनीने स्पष्ट केले आहे. याशिवाय कंपनीने आधीपासून सब्सक्राइब केलेल्यांसाठी २१ दिवसांसाठी आपली ‘फिटनेस व्हॅल्यू अॅडेड’ ही सेवा मोफत केली आहे. या सेवेद्वारे टाटा स्कायद्वारे विविध तज्ज्ञांचे फिटनेस व्हिडिओ ब्रॉडकास्ट केले जातात. साधारणपणे या सेवेसाठी प्रतिदिन दोन रुपये कंपनी आकारते. पण लॉकडाउन संपेपर्यंत ही सेवा फ्रीमध्ये उपलब्ध असेल.