22 September 2020

News Flash

घरवापसी? टाटा समूह एअर इंडिया विकत घेण्याच्या तयारीत

या महिन्याच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुप एअर इंडियासाठी बोली लावणार?

(संग्रहित छायाचित्र)

टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचं स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झालं व तिचं नामकरण एअर इंडिया करण्यात आलं. परंतु सुमारे 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाखाली बुडाल्यामुळे एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा प्रस्ताव आहे, आणि पोएटिक जस्टिस किंवा काव्यात्मक न्याय म्हणता येईल अशी बाब म्हणजे ही कंपनी विकत घेण्यास पुन्हा टाटा समूहच पुढे येत असल्याचं दिसत आहे.

टाटा ग्रुपने एअर इंडियाचं मूल्यांकन करण्यास सुरूवात केली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत टाटा ग्रुप एअर इंडियासाठी बोली लावेल असं मानलं जात आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पण, जोपर्यंत मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत यावर काहीही प्रतिक्रिया देणं घाईचं ठरेल, असं काही अधिकाऱ्यांनी म्हटलंय. कंपनी सध्या या प्रस्तावाचं मूल्यांकन करत आहे, मूल्यांकन झाल्यानंतर योग्य वेळ आल्यावरच कंपनी बोली लावेल, असं टाटा सन्सच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं. सध्या आर्थिक भागीदार आणण्यासंबंधी कंपनीची कोणतीही योजना नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

एअर इंडियाच्या योग्य मूल्यांकनासाठी टाटा ग्रुप सध्या कायदेशीर सल्ला घेत असून सल्लागारांसोबतही चर्चा करत आहे. टाटा ग्रुप लवकरच एअर एशिया इंडिया आणि एअर इंडिया यांचं विलीनीकरण करु शकतं अशीही चर्चा आहे. एअर एशिया इंडियामध्ये टाटा सन्सची 51 टक्के भागीदारी आहे. म्हणजे एअर इंडिया आणि एअर एशिया इंडिया यांचं विलीनीकरण होऊन केवळ एअर एशिया इंडिया कंपनी राहील, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. एअर एशिया इंडियाशिवाय पाच वर्ष जुनी विमान कंपनी ‘विस्तारा’मध्येही टाटा ग्रुपची भागीदारी आहे. ‘विस्तारा’मध्ये टाटाशिवाय सिंगापूर एअरलाइन्सची 49 टक्के भागीदारी आहे.

मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही असे टाटा ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर काही तज्ज्ञांनी, ‘एअर इंडियाला खरेदी करणं किचकट प्रस्ताव आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रियांचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच, स्टेकहोल्डर्सचं समर्थन आणि सरकारच्या मदतीचीही गरज आहे’, असं  म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 1:22 pm

Web Title: tata sons weighing bid for air india may make formal bid by end of this month check details sas 89
Next Stories
1 आता अ‍ॅमेझॉनद्वारे ऑर्डर करा औषधेही, कंपनीने लाँच केली ‘अ‍ॅमेझॉन फार्मसी’
2 गुगल प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरने हटवला लोकप्रिय ‘ऑनलाइन बॅटल गेम’, कारण…
3 चार कॅमेऱ्यांच्या ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा आज ‘सेल’, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी
Just Now!
X