12 July 2020

News Flash

कॉलेजजवळची ती टपरी…

कॉलेजजवळची चहाची टपरी अनेक विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकते.

भगभगणाऱ्या स्टोव्हवरील पितळेच्या भांडय़ात उकळणारा चहा नाही म्हणता म्हणता तुमचं टॉनिक होऊन जातं.


चहा विशेष

प्रशांत ननावरे – response.lokprabha@expressindia.com
कॉलेजमध्ये गेल्यावर त्या विश्वाची नीट ओळख आणि मैत्री होण्यासाठीचे समाजमाध्यम म्हणजे कॉलेजजवळ असलेली चहाची टपरी. ती अनेक विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकते.

अकरावीत गेल्यावर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी वर्गात जायच्याही आधी मी स्टुडंट काऊंन्सिलच्या ऑफिसमध्ये गेलो आणि नाटकाचा ग्रुप कुठे असतो याची विचारणा केली होती. क्षणाचाही विलंब न लावता ऑफिसमधील एकजण म्हणाला, ‘‘दुबेजींकडे असतील सर्वजण.’’

आता हे दुबे कोण?

मला त्यांच्या बोलण्याचा काहीच बोध झाला नाही. आडनावावरून दुबेजी ही कोणीतरी व्यक्ती असल्याचं तेवढं लक्षात आलं. पण मराठी कॉलेजमध्ये हिंदी आडनावाची व्यक्ती? का असू नये? दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ अकादमीतील कुणी प्राध्यापक आपल्या महाविद्यालयात नाटकाचे धडे देत असतील तर?

आपलं तर नशीबच फळफळेल, असा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी मनातून आनंदून गेलो.

पण हे प्राध्यापक (?) दुबेजी नेमके बसतात कुठे हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. म्हणून माझा पुढचा प्रश्न तोच होता. त्यावर उत्तर मिळालं, ‘‘मागच्या गेटजवळ.’’

कॉलेजचा पहिलाच दिवस होता, त्यामुळे आणखीन प्रश्न विचारायला नको, नाहीतर आपलं रॅगिंग व्हायचं या विचाराने मी कॉलेजच्या मागच्या गेटच्या दिशेने चालू लागलो. चालताना डोक्यात अनेक चक्रे फिरत होती. प्राध्यापक (?) दुबेजी कसे दिसत असतील, त्यांची बोलण्याची स्टाईल काय असेल, त्यांच्या आजूबाजूला विद्यार्थाचा कसा घोळका जमलेला असेल आणि आपल्यासारख्या नवख्याकडे पाहून ते काय प्रतिक्रिया देतील, आपल्याला नाटकाच्या ग्रुपमध्ये घेतील का? वगरे वगरे.

मी मागच्या गेजवळ पोहोचलो तर तिथे मोकळं मदान होतं आणि कॉलेजबाहेर जाण्याचा रस्ता. पहिल्याच दिवशी माझं रॅगिंग झाल्याची भावना मनात दाटून आली. पण तरीही हिम्मत करून गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाला प्राध्यापक (?) दुबेंजीविषयी विचारायचं ठरवलं.

त्याच्यापाशी जाऊन, ‘‘दुबे सर कुठे बसतात?’’ असा सवाल केला तर तो त्याने माझ्याकडे चमकून पाहिलं आणि उलट प्रश्न विचारला. ‘‘दुबे सर?’’

मला काहीच कळेना. मी मख्ख चेहऱ्याने त्याच्या तोंडाकडे पाहात राहिलो.

मी नवखा असल्याचं त्याने हेरलं आणि म्हणाला, ‘‘अरे ते सर नाहीत, तो चहावाला आहे.’’ गेटसमोरील रस्त्याच्या कडेला फुटपाथवर असलेल्या चहाच्या टपरीकडे बोट दाखवत त्याने खुलासा केला.

काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नव्हतं. पण तरीही हिंमत करून मी त्याला विचारलं.

‘‘नाटकाचा ग्रुप कुठे असतो?’’

त्यावर को म्हणाला, ‘‘ती काय, दुबेजीकडे बसलेली सर्व पोरं नाटकवालीच आहेत.’’

आणि दुबेजी हे प्राध्यापक नसून चहावाला आहे, याचा खुलासा झाला.

शाळेत येता-जाताना आजूबाजूला रस्त्याच्या फुटपाथवर असलेल्या चहाच्या टपऱ्या पाहात होतो. पण तिथे जाण्याचा कधी संबंध आला नव्हता. लोक रस्त्यावर उभं राहून काचेच्या ग्लासातून का चहा पितात, हा प्रश्न एक-दोनदा पडला होता. पण त्यावर फारसा विचार केला नव्हता. पण दुबेजींच्या चहाच्या टपरीमुळे हे एक वेगळंच विश्व असल्याचं कळलं. फुटपाथवरील ही जागा म्हणजे केवळ घोटभर चहा घेण्याचं ठिकाण नसून मजा-मस्ती, भांडणं, प्रेम फुलण्याची, व्यसन लागण्याची (चहाचं), मित्र-मत्रिणींना भेटण्याची हक्काची जागा आहेच, पण त्याव्यतिरिक्तही विजयाचं सेलिब्रेशन करण्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याचीही जागा आहे. लेक्चरला दांडी मारल्यावर कुठे बसायचं, मित्रांना कुठे शोधायचं, एखाद्याला भेटायला कुठे बोलवायचं, नोट्स पूर्ण करायची, डुलकी घ्यायची अशी हक्काची जागा.

भगभगणाऱ्या स्टोव्हवरील पितळेच्या भांडय़ात उकळणारा चहा नाही म्हणता म्हणता तुमचं टॉनिक होऊन जातं. दिवसाची सुरुवात आणि शेवट ‘कटिंग चहा’ने होते. इथे येणाऱ्या प्रत्येकाची आवड त्या चहावाल्याला माहिती असते. आणि एक-दोनदा आल्यानंतर पुढच्या भेटीत व्यक्तीला पाहूनच तो त्याच्या पसंतीचा चहा वेगळ्या पातेल्यात बनवायला घेतो. कडक, मीठा, अद्रक तेज, बिनसाखरेचा, कोरा, सुलेमानी, पानी कम अशा लोकांच्या चहाच्या सवयी त्याला बरोबर ठाऊक असतात. पेटत्या स्टोव्हमधून येणारा रॉकेलचा वास, पातेल्यामध्ये चमच्याने केलेला नाद, साखरेच्या डब्यातील साखर टाकतानाची विशिष्ट स्टाईल, खलबत्त्यात चेचल्या जाणाऱ्या आल्याचा सुगंध, सुतीच्या कापडातून चहा गाळताना ‘लवकर दे’ ही मनाला लागलेली हुरहुर आणि गरम आहे हे माहीत असूनही चहाचा ग्लास हातात पडण्याची सुरू असलेली धडपड. केवढंतरी नाटय़ सामावलंय एका चहाच्या पेल्यात.

कालांतराने टपरीवरचा चहाच नव्हे तर तो बनवणारा चहावाला तुमचा घनिष्ट मित्र होऊन जातो. मित्र येवो अथवा न येवो, तुमच्याशी गप्पा मारायला तो कायम तिथे असतो. प्रत्येकासोबत तो आपल्या घरातील आणि सार्वजनिक आयुष्यातील गोष्टी शेअर करतो. तुमच्या मनातलं ऐकून घेतो आणि चहाचा वाफाळता ग्लास हातात ठेवताना एखादा सल्लाही देऊन जातो. त्याला सर्वाची गुपितं माहीत असतात. तो ती तेवढय़ाच विश्वासाने मनात ठेवतो आणि अगदी गरज पडेल तेव्हा इतरांसोबत शेअरही करतो. चहाच्या टपरीची खासीयत म्हणजे इथे माणसं जोडली जातात. म्हणूनच चहावाल्याकडे इथे येणाऱ्यांची सर्व गुपितं असतात. चांगल्या-वाईट गोष्टींचा निरोप त्याच्याकडे दिला जातो. म्हणूनच चहावाला हा खरं तर एकेकाळचा ‘सोशल मीडिया’च होता हे नाकारता येत नाही. कारण दिसत नसल्या तरी त्या टपरीच्या अवकाशात दिवसभर असंख्य गोष्टी शेअर होत असतात. काल काय झालं, आज काय घडतंय, उद्या काय करायचंय किंवा वर्षभरापूर्वी इथेच कसा दंगा केला होता या सर्व गोष्टीची नोंद याच अड्डय़ाच्या अवकाशात होत असते. इथेच प्लान्स तयार होतात आणि गोष्टी फिस्कटतातही. चहाच्या एकाच ग्लासातून प्रेम जुळतं आणि तोच ग्लास नकोसाही वाटू लागतो. विचार करा, की प्रत्येक चहाच्या टपरीने स्वत:चं आत्मचरित्र लिहायचं ठरवलं तर किती इंटरेस्टिंग साहित्य निर्माण होईल.

चहा तयार होताना, चहाचे भुरके घेताना आणि रिकामा ग्लास हातात पकडूनही लोक गप्पा मारत असतात. खरं तर चहा हे केवळ निमित्त असतं. पण हे निमित्त ‘आपण’ व्हावं यासाठी ‘चहा’ स्वत:ला किती भाग्यवान समजत असेल नाही. कदाचित चहाची टपरी अशी एकमेव जागा असावी जिथे सर्व भेद नष्ट होऊन जातात. फाटक्या शर्टाच्या कामगारापासून ते टाय लावलेल्या ऑफिसपर्यंत, पोलीस, वकील, डॉक्टर, पत्रकार, नेतेमंडळी, कार्यकत्रे, कलाकार, पुरुष, स्त्रिया, ‘ते’,  सर्व जाती, धर्माचे, भाषेचे लोक इथे एकत्र येतात. दिवस उजाडल्यापासून दिवस मावळल्यानंतरही ही जागा कायम माणसांनी गजबजलेली असते. लोकांच्याही टपरीवर येण्याच्या वेळा आणि कारणं ठरलेली असतात. काही लोकं गरमागरम चहाचे भराभर घोट घेत तो संपवतात, तर काही बिनकामाचे तासन्तास इथे बसून असतात. कुणासाठी ती एकाकीपणाचा सहारा होऊन जाते, तर कुणासाठी तरी माणसं जोडण्याचं ठिकाण. कधी कधी ही चहाची टपरी दूर आडवाटेवरील गावातील एसटीचा खांबा बनतो, तर कधी शहरातील उच्चभ्रू वस्तीतील लोकांसाठी सिगारेटच्या झुरक्यांच्या साथीला अस्सल कडक ‘अमृतानुभवन’ घेण्याचा अड्डा.

खिशाला परवडला नाही तर तो चहा कसला? पण त्याचीही मजा इथेच येथे. कॉलेजमध्ये चहाच्या टपरीवर चहा प्यायलेल्या प्रत्येकाला विचारा, की खिशाला परवडणारा असला तरी त्यांनी किती वेळा त्याच कटिंगसाठी मित्रांना मस्का मारावा लागला? चाचणी परीक्षेत काठावर पास होऊ दे किंवा एकांकिका स्पध्रेत प्रथम पारितोषिक मिळू देत पार्टी चहाचीच झाली पाहिजे. ज्या दिवशी साध्या कटिंगवरून स्पेशल चहाची ऑर्डर येईल त्या दिवशी चहावालाही खूश. ‘आज नकद, कल उधार’, असं लिहिलेलं असतानाही इथे पशासाठी कधी कुणाला नाराज केलं जात नाही. चहावाल्याच्या चोपडीची गणना तर सर्वोत्तम दस्तावेजात करायला हवी. किती लोकांची नावं, हिशेब, तारखा, वेळा, सवयी असं सर्व काही त्यात असतं. आणि मुख्य म्हणजे त्या चहावाल्याला कुठल्या पानावर काय आहे, हे अचूक ठाऊक असतं. डोळे बंद करून तो ते पान उघडतो आणि कटिंगची नोंद करतो, हे विशेष.

चहाची टपरी म्हणजे मानवजातीला खरं तर वरदानच म्हणायला हवी. कारण ऋतू कोणताही असो, चहावाला वर्षांचे बाराही महिने दिवस-रात्र तिथे असतो. हिवाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंमध्ये तर कटिंग चहाची मजा काय असते हे वेगळं सांगायला नको. धो-धो कोसळणाऱ्या पावसात अंगावर पावसाचे तुषार झेलत चहाचे घोट घेण्यासाखं सुख नाही, सकाळच्या बोचऱ्या थंडीत चहाच्या टपरीपर्यंत चालत जाऊन हातात गरमागरम चहाचा ग्लास पकडण्याची आतुरता काही वेगळीच असते. परंतु उन्हाच्या झळा बसत असतानाही गरम चहाचा घोट घशाखाली उतरल्यावर मिळणारं समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही.

चहाचं हे असं तर त्याच शहरांमध्ये, त्याच कॉलेजांच्या परिसरात आता ‘कॅफे’ ही संकल्पना हळूहळू मूळ धरू लागली आहे. या कॅफे संस्कृतीमध्ये चहाला बगल देऊन कॉफीचा प्रचार, प्रसार मोठय़ा प्रमाणात होताना दिसतो. हे कॅफे तरुणांच्या आणि इतरांच्याही पसंतीस उतरतातही, कारण लोकांचं जीवनमान आता उंचावलेलं आहे. त्यांच्या गरजा बदललेल्या आहेत. वातानुकूलित कॅफेमध्ये बसून मोफत वायफाय वापरणं ही आजच्या काळाची फॅशन, गरज (?) झाली आहे. ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीला भेटण्याचं ठिकाण म्हणून कॅफेला पसंती दिली जाते. कॉफी कॅफेंसोबत आता चहाचेही कॅफे उघडले आहेत. हळूहळू तिथेही लोकांची गर्दी वाढायला लागली आहे. कॅफेमध्ये बसून टपरीवरच्याच चवीच्या (टपरीच्या चहाची चव कॅफेतील चहाला नाही म्हणा)  चहासाठी लोक आता आनंदाने ७०-८० रुपये खर्च करतात.

खरं तर टपरी आणि कॅफे या दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत. त्यामुळे त्यांची तुलना करणं योग्य ठरणार नाही. दोन्हींचा काळ वेगळा, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असल्या कारणाने नव्याला वाईट ठरवून जुन्याचे गोडवे गाण्यात अर्थ नाही. तरीही ज्यांनी चहाच्या टपरीवरील चहाची मजा अनुभवली असेल त्यांनाच त्यातील गंमत कळेल. विशेष म्हणजे, टपरीवरचा चहा ही संकल्पना अद्याप कालबाह्य़ झाली नसल्यामुळे टपरीवरचं विश्व अनुभवण्याची संधी अजूनही शिल्लक आहे. ती अजिबात सोडता कामा नये. टपरीवरच्या चहाचा एक घोट तुमचं अवघं विश्व बदलून टाकेल.
छायाचित्र : संतोष परब
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2018 3:43 pm

Web Title: tea stall near college
Next Stories
1 व्यायाम तर करायचाय, पण…
2 जननदोषांच्या माहितीसाठी ‘मिनी प्लासेंटा’
3 जगातला सर्वात स्वस्त LCD TV लाँच, किंमत केवळ 3,999 रुपये
Just Now!
X