दिवसभराचा थकवा, आळस घालवणारं पेय म्हणजे चहा. मित्रांची मैफिल जमल्यावर त्याची रंगत वाढविणारं पेय म्हणजे चहा. त्यामुळे या चहाची भुरळ केवळ भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगभरातल्या चहाप्रेमींना पडली आहे. अनेकांची तर सकाळ चहाशिवाय सुरु होत नाही. त्यामुळे चहा म्हणजे अनेकांसाठी अमृततुल्य पेय आहे. विशेष म्हणजे चहाचे अनेक प्रकार असून यातील काही चहांचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करायचं असेल अंशिका सारडा यांनी सांगितलेल्या या चार चहांचं सेवन नक्कीच प्रत्येकाने केलं पाहिजे.

१. ग्रीन टी –
वजन कमी करण्यासाठी किंवा पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणारा चहा म्हणजे ग्रीन टी. काही वेळा अनेक जण उत्साहामध्ये या चहाचं सेवन करतात. मात्र कालांतराने चव न आवडल्यामुळे त्याचं सेवन करणं बंद करतात. परंतु हा चहा प्रचंड गुणकारी असून वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. वजन कमी करण्यासोबतच याचे अनेक फायदे आहेत. निराशा घालविण्यासाठी, हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी, अल्झालमर आणि पार्किनसन्सवर उपयुक्त,त्वचारोगापासून मुक्तता मिळविण्यासाठी या चहाचा उपयोग होतो.

२. ओलोंग टी –
ओलोंगे टीमध्ये चयापचयन वाढविणारे घटक असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी हा चहा सर्वोत्तम पर्याय आहे. या चहाच्या सेवनामुळे शरीरातील फॅट्स लवकरच बर्न होतात. त्यासोबतच पोटावरील चरबीदेखील कमी होते.

३. व्हाईट टी –
व्हाईट टीमध्ये अॅण्टी ऑक्सिडेंट्स आणि अॅझाइम्स फॅट कमी करणारे घटक असतात. त्यामुळे जलदगतीने वजन घटविण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो.

४. हर्बल टी –
भारतीयांची सर्वाधिक पसंती असलेला चहा म्हणजे हर्बल टी. आलं, तुळस यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून हा चहा तयार करण्यात येतो. या चहाच्या सेवनामुळे पचनसंस्थेचं कार्य सुधारतं आणि चयापचयनाची क्रिया सुधारते. त्यासोबतच शरीरातील मेददेखील कमी होण्यास मदत होते.