News Flash

करोनाविरोधातील तंत्र

या संपूर्ण काळात एक क्षेत्र मात्र अविरतपणे कार्यरत राहिलं आहे, ते म्हणजे तंत्रज्ञान.

भारतासह जगभरात करोना विषाणूने थैमान मांडल्याला आता दीड वर्ष लोटत आलं आहे. या विषाणूने गेले वर्षभर संपूर्ण जगातील व्यवहार विस्कळीत केले. सर्वच देशांतील अर्थव्यवस्था मोडकळीस आली. उद्योगधंदे बंद ठेवावे लागले. मात्र, या संपूर्ण काळात एक क्षेत्र मात्र अविरतपणे कार्यरत राहिलं आहे, ते म्हणजे तंत्रज्ञान. करोनाविरोधातील लढाईत आरोग्य यंत्रणा, प्रशासन झुंज देत असताना तंत्रज्ञान क्षेत्राने त्यांच्यासाठी अद्ययावत उपकरणे, यंत्रे निर्माण करत मानवाची बाजू बळकट केली आहे. करोनाला प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्यासारख्या जीवाणू-विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी गेल्या काही महिन्यांत तंत्रक्षेत्रात आलेल्या अशाच काही नव्या गॅजेट, उपकरणांविषयी..

जंतुविरहित कीबोर्ड

कार्यालयात किंवा घरातही कॉम्प्युटरचा कीबोर्ड हा नेहमी उघडय़ावरच असतो. हा कीबोर्ड हाताळणाऱ्या व्यक्ती एकाहून जास्त असतील तर साहजिकच यातून विषाणुप्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आता स्वयं जंतुनाश करणारा कीबोर्ड उपलब्ध झाला आहे. वरील उपकरणाप्रमाणेच यातही एक मोठी पेटी असून त्यात अल्ट्राव्हायोलेट सी प्रकाशाचा मारा करणारी यंत्रणा आहे. वापर नसेल तेव्हा कीबोर्ड पेटीच्या आत सामावलेला असतो. पेटीच्या पुढे हात धरताच त्यातून कीबोर्ड बाहेर येतो. वापरकर्ते कीबोर्ड निर्जंतुकीकरणाची वेळ ठरवून देऊ शकतात.

हवाशुद्धीकरण नेकबँड

हे उपकरण विषाणू, जीवाणू रोधक नसलं तरी हवा शुद्ध करण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. हे एक छोटंसं हवाशुद्धीकरण यंत्र असून हवेतील पीएम २.५, फॉर्मलडिहाइडसारख्या विषारी द्रव्यघटकांपासून ते संरक्षण करतं. गळय़ाभोवती सहज बसणारं हे उपकरण यातील दोन पोकळय़ांमधून दर सेकंदाला वीस लाख निगेटिव्ह आयन फेकतं. हे आयन हवेतील विषारी घटकांना जाऊन चिकटतात. त्यामुळे हे घटक जड होऊन खाली पृष्ठभागाकडे ढकलले जातात. त्यामुळे तुमच्या श्वासासोबत हे घटक शरीरात जात नाहीत.

पेन सॅनिटायझर

वरकरणी ही फार किरकोळ बाब वाटू शकेल. मात्र, पेन ही अशी वस्तू आहे जी माणूस कोणाशीही लगेच शेअर करतो. बँकेत असो की कार्यालयात एकमेकांचा पेन वापरणं, हे सहज स्वाभाविक बनलं आहे. मात्र, पेनची अशी देवाणघेवाण करोना प्रसाराला कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच ‘स्टेरि-राइट’चा (Steri-Write) उगम झाला.  पेन अल्ट्रा व्हायोलेट-सी प्रकाशाने निर्जंतुक करणारं हे उपकरण आहे. एवढंच नव्हे तर, यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर बसवलेला असून उपकरणाच्या खालच्या बाजूस हात ठेवताच आतील पेन आपोआप हातात येऊन पडतं.

सॅनिटायझर स्टिकर

विविध उपकरणे, वस्तू सॅनिटाइझ करण्याचा आणखी एक पर्याय तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिला आहे. हे एक छोटे स्टिकर असून स्मार्टफोनच्या मागील बाजूस ते बसवता येते. या स्टिकरमधूनही अल्ट्राव्हायोलेट सी प्रकाश बाहेर फेकला जातो. त्याद्वारे तुम्ही कोणतीही वस्तू कुठेही निर्जंतूक करू शकता. दार उघडबंद करताना, लिफ्टमधील बटने हाताळताना, सार्वजनिक ठिकाणी खुर्ची-टेबल किंवा अन्य उपकरणे हाताळताना हे स्टिकर खूपच उपयुक्त ठरते. या स्टिकरमध्ये छोटी लिथियम बॅटरी बसवण्यात आली असून ती स्मार्टफोनच्या चार्जरच्या मदतीने चार्ज करता येते.

स्मार्टफोन सॅनिटायझर

पेनची इतकी काळजी तर फोनची किती? स्मार्टफोन तर दिवसाचे चोवीस तास आपल्या सोबत असतो. आपण जाऊ तिथे स्मार्टफोन घेऊन जातो. अशावेळी स्मार्टफोनवर जीवजंतू, विषाणू जमा होण्याचा धोका असतोच. त्यामुळेच सॅमसंग कंपनीने स्मार्टफोन स्टरिलायझर बाजारात आणले. ही एक पांढऱ्या रंगाची पेटी असून त्यात स्मार्टफोन ठेवून अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाच्या मदतीने तो निर्जंतूक करता येतो. हे उपकरण दहा मिनिटांत स्मार्टफोनवरील ९९ टक्के जीवजंतू नाहीसे करतो, असा सॅमसंगचा दावा आहे. ही पेटी वायरलेस चार्जरची भूमिकाही योग्यपणे बजावते. त्यामुळे निर्जंतुकीकरण होतानाच फोन चार्जही करता येतो. एवढंच नव्हे तर, या आयताकृती पेटीत तुम्ही इअरबड्स, चष्मेदेखील जंतुविरहित करू शकता.

हेडफोनयुक्त मुखपट्टी

करोना विषाणू आणखी काही काळ आपल्यावर हल्ला करतच राहणार आहे. त्यामुळे मुखपट्टीचा वापर अनिवार्य बनला आहे. त्यामुळेच ‘मास्कफोन’ची निर्मिती करण्यात आली आहे. मुखपट्टीतच हेडफोनची सुविधा असलेला हा ‘मास्कफोन’ अनेक कारणांसाठी उपयुक्त आहे. एकतर या मास्कफोनमुळे तुम्हाला तुमच्या फोनला स्पर्श न करता येणारे कॉल स्वीकारता येतात. तुम्ही काम करताना किंवा प्रवास करताना गाणी ऐकू शकता. गाणी फॉरवर्ड करण्याची, आवाज वाढवण्याची बटणेही मुखपट्टीवरच पुरवण्यात आली आहेत. या मुखपट्टीतील फिल्टर बदलून ती दीर्घकाळ वापरता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 12:41 am

Web Title: techniques against coronavirus zws 70
Next Stories
1 ‘Dagger Edge’ व्हर्जनमध्ये आली नवीन Bajaj Pulsar 150, Pulsar 180 आणि 220F ; किंमत…
2 Samsung चा नवीन 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच, ‘मिडरेंज’ सेगमेंटमध्ये दमदार फिचर्स
3 करोना संकटात Maruti Suzuki चा मदतीचा हात, रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी घेतला मोठा निर्णय
Just Now!
X