अपघातस्थळी रुग्णवाहिका बोलावणे तंत्रज्ञानाच्या मदतीने सुलभ होणार आहे. दूरध्वनीला इंटरनेट जोडणी नसली तरी केंद्र सरकारच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला ठिकाण माहीत नसले तरी संबंधित ठिकाणी जाणे शक्य होईल, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकताच याबाबत गुगल व दूरध्वनी सेवा पुरवठादारांशी याबाबतचा करार केला आहे.  दुहेरी तंत्राच्या आधारे याचा वापर असेल. ‘सेल टाऊन ट्राऊन ट्रँग्युलेशन’ व ‘गुगल इमर्जन्सी लोकेशन सव्‍‌र्हिस’ त्यानुसार अपघाताचे नेमके स्थळ सापडेल. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अभिजित कल्पेश यांची ही कल्पना आहे. २०१६ मध्ये चंदीगढ येथून भटिंडा येथे जात असताना त्यांना अपघातग्रस्त वाहन दिसले. त्या वेळी रुग्णवाहिकेला त्यांनी दूरध्वनी केला. मात्र काही अडचणींमुळे नेमके घटनास्थळ ते सांगू शकले नाहीत. त्यानंतर तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नंतर ती रुग्णवाहिका संबंधित ठिकाणी आली. या प्रकारानंतर अशा वेळी तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांच्या मदतीसाठी काही करता येईल काय याचा विचार त्यांनी केला. आरोग्य मंत्रालयात सहसचिव म्हणून गेल्यावर वरिष्ठांकडे त्यांनी याबाबत कल्पना बोलून दाखविली. मग त्याचे सादरीकरण झाल्यावर सप्टेंबर २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ती कल्पना सादर करण्यात आली. मोदींनी त्याचे कौतुक केले. तर प्रायोगिक तत्त्वावर उत्तर प्रदेशात ती राबविण्याची सूचना केली. जानेवारीपासून  ही योजना राबविण्यात येत आहे. त्याला यश मिळाले तर देशभर राबविली जाईल.