भारती ढोरे-पाटील

आई होणं, मातृत्व उपभोगणं ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे, असं म्हटलं जातं. मात्र काही स्त्रियांना वैयक्तिक कारणांमुळे आई होण्यास अडचण निर्माण होते. परंतु, सध्याच्या घडीला वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या मदतीने स्त्रियांना कितीही समस्या असल्यातरीदेखील आई होण्याचा आनंद मिळू शकतो. यातलीच एक उपचार पद्धती म्हणजे आयव्हीएफ प्रक्रिया. नैसर्गिकरित्या पालकत्वाचा अनुभव घेता न येणाऱ्या जोडप्यांकरिता आयव्हीएफ प्रक्रियेद्वारे कृत्रिमरित्या पालकत्वाचा अनुभव मिळू शकतो. परंतु, या प्रक्रियेविषयी नागरिकांमध्ये अनेक गैरसमज आणि भीती असते.त्यामुळे ही भीती आणि गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे.

१. अनेकांना वाटतं की आयव्हीएफ प्रक्रिया सुरक्षित नाही. परंतु, हा गैरसमज आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि खात्रीशीर असून कृत्रिम पद्धतीने जोडप्यांना पालकत्वाची संधी देते. त्यामुळे ही ट्रिटमेंट एखाद्या उत्तम आणि मान्यताप्राप्त क्लिनिकचीच निवड करावी.

२. आयव्हीएफ उपचार घेण्यासाठी जोडप्यांना रुग्णालयात काही दिवसांसाठी अॅडमिट व्हावं लागतं असं म्हटलं जातं. मात्र तसं अजिबात नाही. या ट्रिटमेंटसाठी केवळ काही तास क्लिनिकमध्ये थांबावं लागतं. त्यामुळे ४-५ दिवस थांबण्याची आवश्यकता नसते.

३. ही ट्रिटमेंट केवळ तरुण जोडप्यांसह वयस्क जोडपीदेखील घेऊ शकतात.त्यासाठी वयाची अट नसते. योग्य उपचार पद्धती आणि काळजी घेतल्यास कोणतेही जोडपं पालकत्वाचा अनुभव घेऊ शकतात.

४. आयव्हीएफ प्रक्रियेने जन्माला येणाऱ्या बाळामध्ये जन्मजात दोष आढळतात तसेच प्रसुती नैसर्गिकरित्या न करता शस्त्रक्रियाच करावी लागते या देखील चुकीच्या समजूती जोडप्यांमध्ये पहायला मिळतात. वास्तविक पाहता जन्मजात दोष असणे यासाठी पालकांमधील जेनेटिक दोष आढळणे, कुटुंबातील इतिहास आदी गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये आयव्हीएफ प्रक्रीयेचा काही संबंध नसतो. उशीराने अपत्य होणा-या पालकांमध्ये गुंतागुंत आढळल्याने जन्माला येणा-या बाळामध्ये काही दोष आढळून येतात.

५. ही प्रक्रिया १०० टक्के यशस्वी होते हा देखील चुकीचा समज जोडप्यांमध्ये पहायला मिळतो. प्रक्रिया शंभर टक्के यशस्वी होण्याकरिता वय, जीवनशैली, पालकांची फर्टीलिटी लेव्हल आदी बाबी कारणीभूत असतात.

६.आयव्हीएफ प्रक्रियेच्या माध्यमातून ४० वर्षापर्यंत बाळासाठी प्रयत्न करता येतात. वास्तविकता महिलांमधील प्रजनन क्षमता पस्तीशीनंतर कमी होत जाते. त्यामुळे ही प्रक्रिया वेळीच करण गरजेचे आहे. यासाठी वेळेचे महत्त्व जाणून योग्य वेळी व योग्य वयात ही प्रक्रिया करून घेणे फायदेशीर ठरते.

(लेखिका भारती ढोरे-पाटील या नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे येथे फर्टिलिटी कन्सल्टंट आहे.)