इलेक्ट्रिक गाड्यांच्या वापराला केंद्र सरकारकडून सातत्याने प्रोत्साहन दिलं जातंय, त्यामुळे देशात इलेक्ट्रिक गाड्या बनविणाऱ्या कंपनींची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. आता यामध्ये एक नवं नाव पुण्याच्या Techo Electra या स्टार्टअप कंपनीचं जोडलं गेलंय. Techo Electra ने एकाचवेळी तीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. Neo, Raptor आणि Emerge या नावाने बाजारात दाखल झालेल्या या तीनही स्कूटरची किंमत अनुक्रमे 43,967 रुपये, 60,771 रुपये आणि 72,247 रुपये आहे.

यामध्ये निओ स्कूटर ही कंपनीची एंट्री लेवल स्कूटर आहे, रॅप्टर ही स्कूटर मिड-रेंज आणि इमर्ज ही कंपनीची फ्लॅगशिप स्कूटर आहे. कंपनीने या तिन्ही स्कूटरमध्ये हब-माउंटेड BLDC मोटार दिली आहे. ही मोटार 250 वॅट क्षमतेची आहे. निओ आणि रॅप्टरमध्ये लीड अॅसिड बॅटरी आणि इमर्जमध्ये लिथियम-आयन बॅटरी आहे. तिन्ही स्कूटरच्या बॅटरी पोर्टेबल आहेत.

चार्जिंग वेळ आणि रेंज –
निओ स्कूटरला पूर्ण चार्ज करण्यासाठी 4 ते 6 तास, रॅप्टरला 6 ते 8 तास आणि इमर्जला पूर्ण चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तासांचा वेळ लागतो. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर निओ 60 किलोमीटरपर्यंत, रॅप्टर 90 किलोमीटरपर्यंत आणि इमर्ज 80 किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकते.

डिझाइन आणि फीचर्स –
निओ आणि रॅप्टर स्कूटरला मॉडर्न लूक देण्यात आला आहे. या दोन्ही स्कूटरमध्ये होंडा डिओप्रमाणे एप्रन माउंटेड हेडलॅम्प आहेत. तर इमर्जमध्ये रेट्रो क्लासिक डिझाइन देण्यात आले आहे. तीनही स्कूटर्समध्ये एलईडी हेडलाइट्स, युएसबी चार्जिंग आणि सेंट्रल लॉकिंग यांसारखे फीचर्स आहेत. रॅप्टर आणि इमर्ज इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि रिवर्सिंग फंक्शन आहेत. तर, निओमध्ये दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. इमर्ज स्कूटरमध्ये पूर्णतः डिजिटल एलसीडी देखील आहे.