देशातील सर्वसाधारण मान्यतेनुसार जरी रावणाला वाईट गोष्टींचे प्रतिक मानून दसऱ्याच्या दिवशी त्याचा पुतळा जाळला जात असला, तरी या बहुचर्चित पौराणिक व्यक्तिमत्वाला इथे अनेक वर्षापासून पूजले जाते. येथील लोकांनी आपल्या या आराध्य देवतेच्या मंदिराचे काम जवळजवळ पूर्ण केले आहे. ‘जय लंकेश मित्र मंडळा’चे अध्यक्ष महेश गौहर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, शहरातील परदेशीपुरा क्षेत्रात १० ऑक्टोबर २०१० पासून आम्ही रावणच्या मंदिराचे काम सुरू केले होते. या मंदिराचे जवळजवळ ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. जर सगळे योजनेप्रमाणे झाले, तर २०१५ च्या दसऱ्याच्या आधी या मंदिरात रावणाच्या १० फूट उंचीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. आमच्या आराध्य देवतेची विधिवत पूजा-अर्चा करता यावी, यासाठी आम्ही रावणाचे मंदिर उभारत आहोत. सरकारी आणि गैरसरकारी संस्थेने अथवा एखाद्या व्यक्तिने रावणाचे मंदिर बनविण्यासाठी दान स्वरूपात जमीन द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु, या प्रयत्नांना यश न आल्याने शेवटी आमच्या पूर्वजांच्या जमिनीवर मंदिर बनविण्याचा निर्णय घेतला. रावण भक्तांच्या संघटनेनी सुरू केलेली दशानन पूजा गेल्या चार दशकापासून येथे सुरू आहे. ही पूजा हिंदूंच्या प्रचलित मान्यतेच्या एकदम विरुद्ध आहे. या परंपरेच्या मागे संघटनेचे आपले असे काही तर्क आहेत. रावण, परम शिवभक्त आणि प्रचंड विद्वान होता. यासाठीच आम्ही चाळीस वर्षांपासून रावणाची पूजा-अर्चा करत आलो असल्याचे गौहर यांनी सांगितले. वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा बंद करण्याचे आवाहनदेखील करत असल्याचे त्यांनी सांगितले. जर, दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा जाळण्याची परंपरा बंद झाली, तर त्यामुळे पर्यावरणाला विशेष मदत हेईल हे सांगण्यासदेखील गौहर विसरले नाहीत.