इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची अखेर भारतात एंट्री झालीये. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ (Tesla Motors India and Energy Pvt Ltd with RoC Bangalore) नावाने भारतात रजिस्ट्रेशन केलं आहे. कंपनी भारतात लग्जरी इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन घेईल.

बेंगळुरूमधून सुरूवात :-

भारतातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमधून टेस्ला आपल्या व्यवसायाला सुरूवात करणार असून इथेच कंपनीने रजिस्ट्रेशन केलंय. यासोबतच कंपनीने तीन डायरेक्टर्सचीही नियुक्ती केली आहे. वैभव तनेजा, वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फेंस्टीन यांची डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. 8 जानेवारी रोजी कंपनीने नोंदणी केली असून नोंदणी नंबर 142975 आहे.

आणखी वाचा- “भारतात पाऊल ठेवण्यासाठी Tesla ने 30 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा विचार केला असता, पण आज…”

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत :-

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी टेस्लाचं कर्नाटकात स्वागत केलं. “मी एलन मस्क आणि टेस्लाचं भारतात व कर्नाटकात स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासाचं नेतृत्त्व करेल”, असं येडियुरप्पा म्हणाले.

दरम्यान, टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरुन काही दिवसांपूर्वी कंपनीच्या भारतातील योजनांबाबत माहिती दिली होती. याशिवाय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही टेस्ला (Tesla) 2021 च्या सुरुवातीला भारतात पदार्पण करेल असं म्हटलं होतं.

टेस्ला ‘मॉडेल 3’ या इलेक्ट्रिक कारपासून भारतात सुरुवात करणार आहे. मॉडेल 3 ही सेडान प्रकारातली कार असून ती 0 ते 100 किमीप्रतितास इतका वेग केवळ 3.1 सेकंदात गाठू शकते. याची रेंज 500 किमी पेक्षा अधिक आहे.