प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला (Tesla) २०२१च्या सुरुवातीला भारतात आपल्या इलेक्ट्रिक कार्सची विक्री सुरु करणार आहे. टेस्ला ही ऐलन मस्क यांची कंपनी आहे. केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली.

गडकरी म्हणाले, “अनेक भारतीय कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी काम करत आहेत. या वाहनांच्या किंमती कमी असतील मात्र तांत्रिकदृष्ट्या ती आधुनिक असतील जशी टेस्लाची वाहनं आहेत. टेस्ला भारतात पहिल्यांदा विक्रीच्या माध्यमातून आपल्या व्यावसायाला सुरुवात करेल. टेस्लाच्या कार्सवर भारतीयांचा प्रतिसाद कसा असेल त्यावरुन नंतर भारतात या कार्सच्या जोडणी आणि निर्मितीवर विचार होणार आहे.”

एलन मस्क यांनी देखील केलं निश्चित

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरवरुन रविवारी कंपनीच्या भारतातील योजनांबाबत माहिती दिली होती. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात मस्क यांनी एका भारतीयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना संकेत दिले होते की त्यांची कंपनी २०२१ मध्ये भारतात दाखल होईल. टेस्लाच्या कार्सचे चाहते अनेक काळापासून भारतात या कार्सच्या विक्रीला कधी सुरुवात होईल याची वाट पाहत होते. एलन मस्क यांचं म्हणणं आहे की, “भारतात कार निर्मितीसाठीच्या नियमावलीनुसार, ३० टक्के मटेरियल स्थानिक असायला हवं, यामुळेच टेस्लाला भारतीय बाजारात यायला उशीर झाला.”

६५९ अब्ज डॉलरचं बाजार मुल्य

टेस्ला ही जगातील दिग्गज कार निर्मिती कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचं बाजार मुल्य सध्या ६५९ अब्ज डॉलर इतकं आहे. २०१९च्या चौथ्या तिमाहित टेस्लाचा महसूल ७.३८ अब्ज डॉलर इतका होता. २०२० मध्येही टेस्लाची वाढ सुरुच आहे. नुकतेच कंपनीला S&P 500 इंडेक्समध्ये स्थान मिळालं आहे.

भारतात दाखल होणारी कार कशी असेल?

टेस्लाच्या कारसाठी कंपनीने केवळ ऑनलाइन बुकिंगचाच पर्याय खुला ठेवला आहे. जानेवारी २०२१ पासून या कारच्या बुकिंगला सुरुवात होईल. त्यानंतर जूनपासून प्रत्यक्ष विक्रीला सुरुवात होईल. टेस्ला ‘मॉडेल ३’ या इलेक्ट्रिक कारपासून भारतात सुरुवात करणार आहे. मॉडेल ३ ही सेडान प्रकारातली कार असून ती ० ते १०० किमीप्रतितास इतका वेग केवळ ३.१ सेकंदात गाठू शकते. याची रेंज ५०० किमी पेक्षा अधिक आहे. चीनच्या शांघाय शहरातील प्रकल्पात ही कार तयार होणार असून त्यासाठी कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. शांघायमधूनच ती भारतात निर्यात केली जाणार आहे. या कारची एक्स शोरुम किंमत ही सुमारे ५० लाख रुपये असण्याची शक्यता आहे.