दिवाळीच्या पाच दिवसातला आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे ‘भाऊबीज’ होय. या दिवशी बहिण भावाला ओवाळते. औक्षण केल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. या दिवशी बहिणीच्या घरी भोजन केल्यानं भावाचं आयुष्य वाढतं अशीही मान्यता आहे. पंचांगकर्ते दाते यांनी या दिवसाचं खास महत्त्व सांगितलं आहे चला तर मग जाणून घेऊयात भाऊबीजेचं महत्त्व

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. या दिवसाला ‘यमद्वितीया’ म्हणूनही ओळखलं जातं. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवायला बोलावून त्याला ओवाळायचे असते. यादिवशी बहिण भावाच्या दिर्घायुष्यासाठी प्राथर्ना करते.

वर्षभरातील इतर सण – उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहायचे असते. म्हणूनच काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे अशा साऱ्या परंपरा सारख्याच आहेत. दिवाळीत पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात कुटुंबात एकोपा राखला जातो म्हणून या सणाला आनंदाचा उत्सव म्हणूनही ओळखलं जातं.