21 October 2018

News Flash

अति साखरेमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत घट

या अवस्थेला ‘शुगर क्रॅश’ असे म्हटले जाते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भरपूर जेवल्यानंतर किंवा साखर खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्ती येते? या अवस्थेला ‘शुगर क्रॅश’ असे म्हटले जाते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता मंदावत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. ग्लुकोज किंवा साखरेचे सेवन केल्यानंतर लोकांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या आणि प्रतिसाद देण्याच्या क्षमतेत घट झाली असल्याचे या अभ्यासात आढळून आले, तर फलशर्करा किंवा कृत्रिम गोड पदार्थाचे सेवन केल्याचा परिणाम कमी असल्याचे आढळून आले.

साखरेचे सेवन केल्यानंतर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता मंदावत असल्याचे आमच्या अभ्यासात आढळून आले, असे न्यूझीलंडच्या ओटागो विद्यापीठाच्या व्याख्याता मेई पेंग यांनी म्हटले. साखरेचे सेवन आपल्या मेंदूच्या कार्यात कशा प्रकारे बदल करते याचा अभ्यास करण्यात आला, त्याचप्रमाणे आपण या गोड पदार्थासाठी आपली चव विकसित केली असल्याचेही पेंग यांनी म्हटले आहे. याबाबत पूर्वी झालेल्या संशोधनांमध्ये शर्करा सेवनाचा स्मरणशक्तीत होणाऱ्या वृद्धीशी संबंध जोडण्यात आला होता. पण शर्करेच्या सेवनामुळे इतर संज्ञानात्मक कार्यपद्धतीवर होणाऱ्या परिणामाच्या चाचणीसाठी करण्यात आलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांनी याबाबत संमिश्र निकाल दिले आहेत. हा अभ्यास ‘सायकोलॉजी अ‍ॅण्ड बिहेव्हियर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासात ४९ लोकांनी सहभाग घेतला होता. या लोकांच्या तीन संज्ञात्मक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या चाचणीपूर्वी सहभागी झालेल्यांना ग्लुकोज, फलशर्करा आणि शर्करायुक्त पेयांचे सेवन करण्याचे निर्देश दिले होते. संज्ञात्मक चाचण्या सोप्या पद्धतीच्या असून त्यात एखाद्या कार्यासाठी लागणारा प्रतिसाद, वेळ आणि अंकगणित मोजमाप प्रक्रियेचे परीक्षण करण्यात आले. संशोधकांनी चाचणीदरम्यान सहभागी असलेल्यांच्या रक्तातील शर्करेच्या प्रमाणाचे मोजमाप केले. या संज्ञानात्मक चाचण्यांमध्ये ग्लुकोज किंवा साखरेचे सेवन केलेल्या लोकांनी वाईट कामगिरी केल्याचे आढळले.

First Published on January 4, 2018 1:36 am

Web Title: the harmful effects of sugar on the body