News Flash

समजून घ्या : लहान मुलांना होणारा थॅलसेमिया हा आजार नक्की आहे तरी काय? त्याची लक्षणं आणि उपचार

जागतिक थॅलसेमिया दिनानिमित्त विशेष लेख

प्रातिनिधिक फोटो

थॅलसेमिया हे नाव आपण ऐकलेले असते पण हा आजार म्हणजे नेमके काय याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. मात्र त्याबाबत योग्य ती माहिती घेणे आवश्यक आहे. या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशावेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांऐवजी कमी दिवस पुरेल इतकी खाली येते. त्याचा परिणाम सरळ शरीरातील हिमोग्लोबीनवर होतो. हा आजार जन्मत: होत असल्याने लहान मुलांना वारंवार बाहेरुन रक्त देण्याची आवश्यकता भासते. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ३ ते ४ टक्के रुग्ण हे थॅलसेमियाचे वाहक असतात. २५ लोकांमधून थॅलसेमियाचा एक मेजर रुग्ण आढळून येतो. वर्षाला साधारण थॅलसेमिया मेजर १२ हजार बाळ जन्माला येतात. आज ८ मे रोजी पाळल्या जाणाऱ्या जागतिक थॅलसेमिया दिनानिमित्त या आजाराची माहिती करुन घेणे आणि त्याच्या उपचारपद्धतीची माहिती घेणे आवश्यक आहे.

हा आजार आहे तरी काय?

आई-वडिलांकडून मुलाला आनुवंशिकतेमुळे जनुकांद्वारे अनेक शारीरिक वैशिष्टय़े, गुणधर्म प्राप्त होतात. याचे एका पिढीतून दुसऱ्या पुढच्या पिढीत वहन होत जाते. बिटा थॅलेसेमिया आजारात बिटा थॅलेसेमिया जनुक आई किंवा वडिलांच्या माध्यमातून अपत्यात येते आणि काही वेळा दोघांकडून प्रत्येकी एक जनुक येतानाही दिसून येतात. परिणामी, रक्ताशी संबंधित थॅलेसेमियाचा आजार होण्याची शक्यता बळावते.

या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशा वेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांऐवजी कमी दिवस पुरेल इतकी खाली येते. त्याचा परिणाम सरळ शरीरातील हिमोग्लोबीनवर होतो. बिटा थॅलेसेमियाचे ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा  ट्रेटवाहक (मेजर) हे दोन प्रकार आहेत. बिटा थॅलेसेमिया असलेल्या रुग्णाच्या शरीरात निरोगी व्यक्तीपेक्षा फिक्कट निस्तेज व लहान आकाराच्या तांबडय़ा रक्तपेशी असतात. थोडय़ा प्रमाणात यांच्यात पंडुरोग (अ‍ॅनेमिया) असतो, परंतु याला सहसा उपचाराची गरज भासत नाही, पण या व्यक्तीद्वारे बिटा थॅलेसेमियाचे एक जनुक त्यांच्या मुलांत संक्रमित होते, तर बिटा थॅलेसेमिया (मेजर) हासुद्धा गंभीर आजार आहे. या रुग्णांच्या शरीरातील प्रत्येक पेशी जगण्यासाठी प्राणवायूचा योग्य प्रमाणात सातत्याने पुरवठा होणे गरजेचे आहे. प्राणवायू वाहून नेण्यासाठी योग्य प्रमाणात तांबडय़ा पेशींत हिमोग्लोबीन असणे अत्यावश्यक आहे. शरीरात हिमोग्लोबीन नसल्याने शरीराला गरजेइतकाही प्राणवायू न मिळाल्याने रुग्णाच्या मृत्यूचा धोका संभवतो.

बिटा थॅलेसेमियाची (मेजर) लक्षणे लहान बाळांत वयाच्या ३ ते ६ महिन्यांदरम्यान दिसू लागतात. हा आजार जडल्यानंतरच लक्षात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री आणि पुरुष हे दोघेही थॅलेसेमियाचे वाहक (थॅलेसेमिया मायनर)असतील तर त्यांच्या मुलांमध्ये बिटा थॅलेसेमिया आढळून येण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत असते.

गंभीर थॅलेसेमियाची लक्षणे

 • बाळाचे वजन घटू लागते.
 • पोटात अन्न, दूध राहात नाही.
 • वारंवार ओकाऱ्या होतात.
 • मुलाची वाढ खुंटते.
 • मुलांना कमालीचा थकवा जाणवतो.
 • थोडय़ाही हालचालीमुळे धाप लागते.
 • रक्त देण्याला विलंब झाल्यास मुले निस्तेज होतात.

गुंतागुंत आणि महत्त्वाचे

 • ठरावीक कालावधीत नियमित रक्त न मिळाल्यास पंडुरोगाचा (अ‍ॅनेमिया) धोका
 • जंतुसंसर्ग होण्याचा धोका.
 • उपचारात रुग्णाला आधार देणे व संयम राखणे गरजेचे.
 • योग्य औषधोपचार व काळजी
 • घेऊन आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

उपचार

 • बिटा थॅलेसेमिया व्याधीग्रस्तांना जगण्यासाठी नियमित रक्त देण्याची गरज असते.
 • दर ४ ते ६ आठवडय़ांनी त्यांना रक्त मिळायलाच हवे.
 • काविळसारखे आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याची गरज.
 • व्याधीमुक्त होण्यासाठी मुलांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय आहे.
 • थोडाही त्रास झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आजार टाळण्यासाठी

  • लग्नापूर्वी युवक-युवतीच्या रक्ताची चाचणी करणे.
  • युवक-युवती दोघेही थॅलेसेमिया वाहक असल्यास लग्न टाळावे.
  • पती-पत्नीपैकी एकही थॅलेसेमियाग्रस्त असल्यास मुलाला आजार संभावतो, ते टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
  • गर्भवती माता थॅलेसेमिया वाहक वा रुग्ण असल्यास १० आठवडय़ांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी.

(माहिती सौजन्य : डॉ. अविनाश गावंडे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 9:22 am

Web Title: the international thalassaemia day 2021 symptoms treatment scsg 91
Next Stories
1 ट्विटरबंदीची प्रक्रिया
2 देशातील सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट SUV झाली महाग, 33 हजारांनी वाढली किंमत
3 करोना इफेक्ट! आठवड्यात फक्त चार दिवस काम, Swiggy ने कर्मचाऱ्यांना दिली ‘गुड न्यूज’
Just Now!
X