News Flash

फॅशनबाजार : जुन्या दागिन्यांचा नवा साज ‘टेंपल ज्वेलरी’

सणांच्या पेहरावात पारंपरिक कपडे आणि त्याला साजेशा पारंपरिक दागिन्यांना मोठे महत्त्व आहे.

सणांच्या पेहरावात पारंपरिक कपडे आणि त्याला साजेशा पारंपरिक दागिन्यांना मोठे महत्त्व आहे.

सणांच्या पेहरावात पारंपरिक कपडे आणि त्याला साजेशा पारंपरिक दागिन्यांना मोठे महत्त्व आहे. दर वर्षी सणांना तेच ते जुन्या धाटणीचे ड्रेस किंवा साडय़ा नेसण्याऐवजी तरुणाई आता विविध प्रयोगांना आपलेसे करू लागली आहे. या नव्या प्रयोगांचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून ‘इण्डो वेस्टर्न कॉम्बिनेशन’ असलेल्या फॅशनची सध्या भलतीच चलती दिसू लागली आहे. तरुण मुलीचा पेहराव अधिक आधुनिक व्हावा यासाठी अधिक नवे आणि भरीव असे शोधण्याचा सध्या प्रयत्न होताना दिसतो आहे. दागिन्यांच्या आघाडीवर असाच बदल होताना अगदी ठसठशीतपणे दिसू लागले आहे. सध्या पारंपरिक दागिने नव्या रूपात येऊ लागले आहेत आणि सर्वाच्या मनाचा ताबाही घेत आहेत.
सध्या जुन्या पारंपरिक दागिन्यांचे रूप बदलून त्यांना अधिक आकर्षक बनविले जात आहे. पारंपरिक शैलीचे दागिने केवळ पारंपरिक किंवा हल्लीच्या भाषेत ‘एथनिक वेअर’वरच चांगले दिसतात, हा समजही गेल्या काही वर्षांपासून काही प्रमाणात पुसला जाऊ लागला आहे. सध्या तरुणींच्या पसंतीस येत असलेली ‘टेंपल ज्वेलरी’ पाश्चिमात्य पेहरावांवरही शोभून दिसते. सध्याच्या सणासुदीच्या दिवसांत तुमच्या फ्युजन वेअरवर किंवा वेस्टर्न वेअरवरही ठेवणीतले दागिने ‘मिक्स अ‍ॅण्ड मॅच’ करता येतात.
टेम्पल ज्वेलरी म्हणजे काय?
पूर्वीच्या काळी गेरू पॉलिश केलेले अधिक वजनाचे सोन्याचे दागिने मिळत असत. अशा दागिन्यांवर साधारणत: देव-देवींच्या प्रतिकृतींची नक्षी कोरलेली असते. अशा जुन्या पद्धतीच्या दागिन्यांना टेंपल ज्वेलरी असे म्हाणतात. सध्या हे दागिने ग्राहकांची अधिक पसंती मिळवत आहेत. पाचू, माणिक, पोवळे, गार्नेट अशा विविध मोत्यांचा वापर करूनही इमिटेशन ज्वेलरी बनविली जाते. क्युबिक झिरकॉनच्या खडय़ांपासून बनविलेल्या ज्वेलरीला सध्या अधिक मागणी आहे. पारंपरिक दागिन्यांबरोबर तसेच पोलकी कुंदन वापरून वेगवेगळ्या रंगांत बनविलेली कॉस्चुम (पेहराव) ज्वेलरी, देवदेवतांच्या प्रतिकृती असलेली ‘टेम्पल ज्वेलरी’, छल्ला, पायल, बिंदी यासारखी फॅन्सी ज्वेलरी बाजारात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे तसेच तिला मागणीही मोठी आहे.
जुने ते नवे..
हल्लीच्या काळात मुलींना पिवळे धम्मक सोन्याचे भरगच्च दागिने नको असतात. अगदी लग्नासारख्या महत्त्वाच्या सोहळ्यातही त्या मोजके पण लक्षवेधी दागिने घालण्यास पसंती देत असतात. नेकलेस, कानातले आणि बांगडय़ा किंवा ब्रेसलेट एवढेच दागिने परिधान करायला फार फार तर त्यांना आवडतात. या महत्त्वाच्या दागिन्यांव्यतिरिक्त बाजूबंद, मांगटिका (म्हणजे बिंदी किंवा बिजवऱ्याचा हल्लीचा अवतार), पैंजण, अंगठय़ा यामध्ये वेगवेगळे प्रकार आणि भरपूर वैविध्य हल्ली बघायला मिळते आहे. हातफुलासारखा जुन्या धाटणीचा दागिनादेखील आधुनिक होऊ लागला आहे. हातफूल आणि केसांमध्ये माळायचे दागिने (हेड अ‍ॅक्सेसरीज) खूप वेगवेगळ्या रूपात बघायला मिळताहेत. ‘टेम्पल ज्वेलरी’ प्रकारातील दागिने हे गेल्या काही वर्षांपासून प्रचलित असले तरी सध्या ते पाश्चिमात्य पेहरावावरही परिधान केले जात आहेत. शिफॉन, जॉर्जेटसारख्या तलम साडय़ांसोबत पूर्वी केवळ हलके दागिने वापरले जात. हिरे,खडे, व्हाइट गोल्ड या ज्वेलरीला महत्त्व होते. आता मात्र ट्रॅडिशनल लुकची ‘टेम्पल ज्वेलरी’ नेटच्या साडय़ांवर किंवा डिझायनर ब्लाऊज आणि जॉर्जेटच्या साडय़ांवरही वापरली जातेय. तीच बाब मांगटिका या दागिन्याची. बिंदीला मांगटिका हा पर्यायी शब्द वापरल्याने ऐकायला जसे भारदस्त वाटते, त्याचप्रमाणे बिंदी ते मांगटिका हा प्रवास फॅशन विश्वात महत्त्वाचा आहे. बिंदीचे नाजूकसाजूक रूप मांगटिक्यात नाही. मांगटिका हा मोठय़ा आकाराचा, गोल, चौकोनी, घुमटाकार असतो. ‘टेम्पल ज्वेलरी’सोबत मांगटिक्याचे समीकरण सर्वाच्याच पसंतीस पडत आहे. पारंपरिक पठडीच्या दागिन्यांमध्ये उठावदार आधुनिकता उतरविण्यासाठी त्यामध्ये विविध प्रयोग करण्यात आले. अशा ‘टेम्पल ज्वेलरी’सोबत डझनभर बांगडय़ांऐवजी ठसठशीत कडे हा उत्तम पर्याय आहे. ते ‘टेम्पल ज्वेलरी’चा बाज राखेल आणि एक आरामदायक पर्यायही ठरेल.
सोने आणि खडय़ाचे कॉम्बिनेशन आपण लग्नकार्यात नक्कीच वापरलेले पाहतो; परंतु छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांसाठी प्रत्येक वेळी सोने आणि हिऱ्याचे दागिने घालणे गरजेचे नाही. मग त्यासाठी पर्याय म्हणून अमेरिकन डायमंड किंवा अ‍ॅण्टिक सिल्व्हर ज्वेलरी सहज उपलब्ध आहे. पण त्यांचा वापर नेमका कुठे, कशासोबत करायचा हे महत्त्वाचे आहे. इंडो-वेस्टर्न ‘टेम्पल ज्वेलरी’बरोबर मोठी अंगठीसुद्धा चांगली दिसते. गोल्ड प्लेटेड किंवा अ‍ॅण्टिक गोल्डमधल्या चंद्र, सूर्य, फूल, कोयरी अशा डिझाइन्सची अंगठी त्यासाठी उत्तम. काही अंगठय़ा चारही बोटांत एकत्र घालता येतील अशा सलग असतात. तर काही ब्रेसलेटसोबत जोडलेल्या असतात. पारंपरिक हातफुलाच्या जवळ जाणारे हे नक्षीचे दागिने. या डिझाइनचे दागिने ठाण्याच्या बाजारामध्ये मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळताहेत. याशिवाय बाजूबंद या दागिन्यानेही सणांच्या काळात मोठी लोकप्रियता मिळवलेली दिसते. साखळी बाजूबंद, कडय़ासारखे दिसणारे बाजूबंद किंवा फोल्डेबल बाजूबंद असे अनेक प्रकार आहेत. काही बाजूबंदांना घुंगरू जोडलेले असतात तर काहींना मोती, पण हे बाजूबंद एकूण लुकची शान वाढवतात हे नक्की. हा दागिना तरुणींच्या पसंतीस येणार यात शंका नाही.
सोन्यामध्ये आता प्लॅटिनम गोल्ड, व्हाइट गोल्ड, रोज गोल्ड असे प्रकार आले आहेत. राजस्थानी, गुजराती, कोलकत्ता, केरळ येथील ‘टेम्पल ज्वेलरी’ला महिलावर्गाची अधिक पसंती आहे. कलाकुसरीला विशेष प्राधान्य देताना भरगच्च व अधिक उठावदार दागिन्यांना महिलावर्गातून विशेष स्वीकारले जाते. आई किंवा आजीचे ठेवणीतले दागिने जुने आहेत म्हणून त्याकडे आपण ढुंकूनही बघत नाही. पण हेच दागिने थोडे वेगळ्या पद्धतीने परिधान केले किंवा थोडे बदल करून घेतले तर त्यातूनच वेगळा कण्टेम्पररी लुक साधता येईल.
’ कुठे- ठाण्यातील सर्व अलंकारांच्या दुकांनामध्ये हे प्रकार पाहायला मिळतील.
’ ठिकाण- जांभळी नाका, राम मारुती रोड, गोखले रोड, बी केबिन, आर मॉल, विविआना मॉल, कोरम मॉल, डोंबिवली मधुबन टॉकिज गल्ली फडके रोड, इत्यादी.
’ किंमत- ३५० ते १५०० रुपये, सोन्याचे १५०००च्या पुढे.

पत्ता : ‘फ्लेवर्स ऑफ स्पाइस’ कॉर्नर, रामचंद्र निवास, वाघ बंगलो, राम मारुती क्रॉस रोड, राजमाता वडापावजवळ, ठाणे (प.).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:16 am

Web Title: the new form of the traditional jewellery
Next Stories
1 गुगलकडून आरोग्यविषयक माहिती देणारे ‘अ‍ॅप’ उपलब्ध
2 पुदिन्याच्या पानातील संयुग कर्करोगावर गुणकारी
3 मधुमेहींच्या संख्येत चारपटींनी वाढ
Just Now!
X