खोकला अनेक कारणांनी होऊ शकतो. विषाणूसंसर्ग, फुप्फुसांचा संसर्ग, यकृतातील दाह, दमा, धूळ तोंडात गेल्याने, सिगारेटचा धूर शरीरात गेल्याने खोकला येतो. त्याची तीव्रता कारणानुसार बदलते. काही वेळा सुका खोकला, तर काही वेळा खोकल्यासोबत जाड थुंकीही बाहेर पडते. जिवाणू किंवा विषाणूसंसर्गामुळे होणारी सर्दी व त्यासोबत येणारा खोकला हे नेहमीचे आजार. काही वेळा सर्दी बरी झाली, तरी खोकला बरेच दिवस राहतो. हा खोकला बरा करण्यासाठी काही उपाय घरच्या घरी करता येतील.

–    थंड खाल्ल्याने विषाणूसंसर्ग होत नाही. मात्र या पदार्थामुळे शरीराचे तापमान कमी होऊन विषाणूंची वाढ वेगात होण्यासाठी पूरक स्थिती होते. थंड पदार्थ हे घशावाटेच शरीरात जात असतात. तेथेच विषाणू वाढत असल्याने हे पदार्थ काही दिवसांसाठी टाळावेत.
–    गरम पाणी, चहा यामुळे घशातील तापमान वाढते व संसर्ग कमी होतो. त्यामुळे आजीबाईंच्या बटव्यातील हे पदार्थ जरूर घ्यावेत.
–    मीठ टाकून सोसवेल एवढय़ा गरम पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम मिळतो.
–    मध हा खोकल्यावरचा हमखास उपाय आहे. मध थेट खाता येतो किंवा गरम पाण्यात मध टाकून घेता येतो.
–    आल्याचा चहाही खोकल्यावर उत्तम उपाय आहे.
–   या साऱ्या उपायांनीही खोकला बरा होत नसेल व आठवडय़ापेक्षा अधिक काळ खोकल्याची तीव्रता कमी झाली नाही, तर मात्र डॉक्टरांकडे जावे.  

डॉ. राकेश दाभाडे
औषधशास्त्र विभाग,
नायर महानगरपालिका रुग्णालय.