आपण नेहमी ज्या जीवनसत्त्व व खनिजांच्या गोळ्या  पूरक उपचार म्हणू घेतो त्याचा शरीराला सातत्यपूर्ण असा कोणताही लाभ होत नाही असे एका अभ्यासात दिसून आले आहे. कॅनडातील टोरांटो विद्यापीठ व सेंट मायकेल हॉस्पिटल यांच्या संशोधकांनी जानेवारी २०१२ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान नियंत्रित चाचण्यांच्या माहितीचा अभ्यास केला असता त्यांना असे दिसून आले की,जीवनसत्त्वाच्या गोळ्यांचा काही फायदा होत नाही. बहुजीवनसत्त्वे(मल्टीव्हिटॅमिन), ड जीवनसत्त्व, कॅल्शियम, क जीवनसत्त्व यांच्या गोळ्या नेहमी घेतल्या जातात पण त्याचा काही फायदा होत नाही.

हृदयविकार, पक्षाघात, अकाली मृत्यू यात त्याचा कुठलाही लाभ झाल्याचे दिसून आलेले नाही. अन्नात जीवनसत्त्व व खनिजे असतात पण काही वेळा ती पुरेशी नसतात म्हणून या गोळ्या घेतल्या जात असतात. या गोळ्यांचे फार कमी सकारात्मक परिणाम दिसून येतात, असे प्रमुख संशोधक डेव्हिड जेनकिन्स यांनी म्हटले आहे. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

बहुजीवनसत्त्व, ड जीवनसत्त्व, कॅल्शियम व क जीवनसत्त्व यांनी काही लाभही होत नाही व अपायही होत नाही. फॉलिक अ‍ॅसिड व बी जीवनसत्त्व यात पक्षाघात व हृदयविकाराचा धोका कमी होतो . दरम्यान नियासिन व अँटीऑक्सिडंट यामुळे कुठल्याही कारणामुळे होणारा मृत्यू प्रतिबंधित करण्यास फार थोडा फायदा होतो. ए, बी १, बी२, बी ३, बी ६, बी ९(फॉलिक अ‍ॅसिड), सी, डी, इ, बिटा कॅरोटिन, कॅल्शियम, आयर्न (लोह), झिंक (जस्त), मॅग्नेशिय व सेलेनियम यांच्या पूरक गोळ्यांच्या परिणामांचा विचार यात करण्यात आला.

अशा गोळ्या घेण्यापेक्षा प्रक्रिया न केलेल्या भाज्या, फळे व इतर अन्नपदार्थ सेवन केल्याने जास्त फायदा होतो असे त्यांचे म्हणणे आहे.