बदामात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. यामध्ये केवळ पोषणमूल्ये आणि जीवनसत्त्वेच नसतात तर त्यामुळे पदार्थाला स्वाद येण्यासही उपयोग होतो. गोड पदार्थांमध्ये बदाम खूपच छान लागतात. मात्र अशाप्रकारे कच्चे बदाम खाण्यापेक्षा भिजवलेले बदाम जास्त आरोग्यदायी असतात.

बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही घटकांमुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषण मिळण्यास मदत होते. पाहूयात काय आहेत भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे…

१. गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते

गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्या आणि गर्भाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ होण्यात मदत होते.

२. भिजवलेले बदाम पचनशक्ती सुधारण्यास मदत करते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

३. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते

रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’नुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते

४. हृदयाचे कार्य सुधारते

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुसार, बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

५. वजन घटवण्यास मदत होते

वजन कमी करायचे असे आपण सतत म्हणत असतो. पण त्यासाठी नेमके काय करावे हे आपल्याला कळत नाही. तर भिजवलेले बदाम खाणे हा यावरील अतिशय उत्तम उपाय आहे. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)