जगातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये जेव्हा एखादी घटना घडते त्याचे सर्वात आधी पडसाद सोशल नेटवर्किंगवर दिसतात. त्यातही ट्विटरसारख्या माध्यमावर हॅशटॅगच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्यांचे प्रमाण हजारोंच्या संख्येत आहे. याच ट्विटर हॅशटॅगला १२ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ट्विटरने जाहीर केलेल्या सर्वाधिक पसंतीच्या हॅशटॅगच्या यादीमध्ये एक वेगळाच हॅशटॅग पहिल्या क्रमांकाला असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आलेल्या लोकसभा निवडणुका आणि कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने खेळलेला विश्वचषक यासारख्या दोन महत्वाच्या घटना या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये घडल्या असल्या तरी या दोन्ही घटना सर्वाधिक चर्चा झालेल्या हॅशटॅगच्या यादीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

भारतीयांनी २०१९ च्या पूर्वार्धात सर्वाधिक वापरलेल्या हॅशटॅगमध्ये लोकसभा निवडणुकांसंदर्भातील #LokSabhaElections2019 हा हॅशटॅग दुसऱ्या स्थानी आहे. क्रिकेट विश्वचषकासंदर्भातील #CWC19 हा हॅशटॅग तिसऱ्या स्थानी आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला #Viswasam हा हॅशटॅग आहे. विश्वासम हा एक तमिळ अॅक्शन-ड्रामा असून या चित्रपटासंदर्भात वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ट्विटर सर्वाधिक चर्चा झाली आहे. या सिनेमामध्ये दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार, नयनतारा आणि साक्षी अग्रवाल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

आजच्या हॅशटॅग दिनानिमित्त ट्विटरने जाहीर केलेल्या सर्वात लोकप्रिय हॅशटॅगची यादी ही १ जानेवारी २०१९ ते ३० जून २०१९ या कालावधीमध्ये वापरण्यात आलेल्या हॅशटॅगच्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. या माहितीनुसार सर्वाधिक वापरण्यात आलेल्या हॅशटॅगच्या यादीत चौथ्या क्रमांकावर तेलुगु भाषेतील अॅक्शन-ड्रामा चित्रपटासंदर्भातील #Maharshi हा हॅशटॅग आहे. याशिवाय पाचव्या स्थानी ट्विटवर प्रोफाइल पिक्चरबदलल्यावर वापरण्यात येणारा #NewProfilePic हा हॅशटॅग आहे. आजच्या हॅशटॅग दिनानिमित्त एक खास हॅशटॅग इमोजी ट्विटरने लॉन्च केला आहे. #Hashtag #हैशटैगदिवस हे दोन हॅशटॅग वापरल्यास त्यापुढे निळ्या रंगाचा हृदयाचा इमोंजी आणि त्यात # हे चिन्ह दिसणार आहे.