वाढलेले वजन कमी करणे हे सध्या अनेकांपुढील एक मोठे आव्हान असते. चुकीची जीवनशैली, आहारातील जंक फूडचा समावेश, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि बैठे काम यांमुळे शरीरावरील चरबी नकळत वाढत जाते. मग कधी आपल्यालाच स्वत:च्या शरीराविषयी नकोसे व्हायला लागते. तर कधी आपण बेढब दिसतो म्हणून आपली चेष्टाही केली जाते. मग आता व्यायाम आणि डाएट नीट फॉलो करुन मी बारीक होणारच असे आपण ठरवतो. जिम किंवा एखादा झुंबाचा क्लास लावला जातो आणि दुसरीकडे सॅलेड आणि कडधान्ये खायला सुरुवात होते. मात्र त्यानेही वजन म्हणावे तसे कमी होतच नाही. वाढत्या वजनाचे आरोग्यावर बरेच विपरीत परिणाम होतात. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यात अडथळे येतात पाहूयात…

आहारात प्रोटीन योग्य प्रमाणात असू द्या

प्रोटीन हे केवळ स्नायूंच्या बळकटीसाठी चांगले असते असा अनेकांचा समज असतो, मात्र याबरोबरच शरीरातील जास्तीचे फॅट बर्न करण्यासाठीही प्रोटीन उपयुक्त असतात. आहारातील प्रोटीनमुळे पोट जास्त काळासाठी भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. यामुळे शरीरातील अतिरिक्त ऊर्जा वापरली जाते आणि त्यामुळे शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

गरजेपेक्षा कमी खाणे धोक्याचे

शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त व्यायाम केलेला चांगला असतो असा अनेकांचा समज असतो. मात्र व्यायाम करण्यासाठी शरीरात पुरेशी ताकद आणि ऊर्जा असणे गरजेचे असते. त्यामुळे कमी खात असाल तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात आणि वजन तर कमी होतच नाही.

वेट ट्रेनिंग

वेट ट्रेनिंगमुळे वजन कमी होत नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र वेट ट्रेनिंग वजन कमी करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. वेट ट्रेनिंगमुळे शरीराचे कार्य सुरळीत होते आणि चरबी घटण्यास मदत होते. वेट ट्रेनिंगमुळे शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात घटते आणि फॅटस बर्न होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

खूप काळ भुकेले राहणे

डाएटींग हे वजन कमी करण्यासाठी आवश्यक असते. मात्र दीर्घ काळ उपाशी राहण्याने वजन कमी होण्याऐवजी वाढते. त्यामुळे डाएट फॉलो करा पण भूक लागली की चांगले आरोग्यदायी पदार्थ खा.

कॅलरीबाबत ही काळजी घ्या

कॅलरीजमुळे वजन वाढते असे आपण म्हणतो. त्यामुळे आहारात कॅलरी घेणे आपण टाळतो. पण ज्यूस किंवा शीतपेये यांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि इतर घटक असतात. त्यामुळे तुम्ही वजन कमी करत असाल तर हे पदार्थही टाळायला हवेत