18 September 2020

News Flash

लठ्ठपणा दूर करण्यासाठी ‘ही’ आसने फायदेशीर!

योगशास्त्र ठरु शकते उपयोगी

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या दिवसभरातील गोष्टींमधील शारीरिक श्रम कमी झाले आहेत. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन न झाल्याने शरीरावरील चरबी वाढते. ही समस्या सध्या अनेकांना भेडसावत असून त्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जातो. भारतीय योगविद्येमध्ये हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही विशेष आसने सांगण्यात आली आहेत. थोडा संयम ठेऊन ठराविक कालावधीसाठी ही आसने नियमितपणे केल्यास त्याचे होणारे परिणाम आपल्याला सहज दिसतात. कोणती आहेत ही आसने पाहूया…

कटीसौंदर्यासन – ज्या व्यक्तींना आपली कंबरेकडील चरबी कमी करायची आहे त्यांनी हे आसन नियमित केल्यास फायद्याचे ठरते. यामध्ये दोन्ही पाय पसरुन जमिनीवर बसावे. दोन्ही हात बाजूला घेऊन एका हाताचा पंजा दुसऱ्या हाताच्या पंज्याला लावण्याचा प्रयत्न करावा. यामुळे कंबरेला काही प्रमाणात पीळ पडतो. त्यामुळे कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होते.

पशुविश्रामासन – दोन्ही पाय पसरुन बसावे. आता डावा पाय मागे नेऊन बाहेरच्या बाजूला दुमडावा. आता उजवा पाय डाव्या पायाच्या जांघेत ठेवावा. आता दोन्ही हात वर करुन श्वास घ्यावा. मग दोन्ही हात जमिनीला टेकवत श्वास हळूहळू सोडावा. ही प्रक्रिया दोन्ही बाजूने करावी. सुरुवातीला ५ वेळा आणि नंतर वाढवत किमान २५ ते ३० वेळा हे आसन केल्यास चरबी कमी होण्यास मदत होते.

कोनासन – एका जागेवर उभे राहून दोन्ही पायांमध्ये समान अंतर घ्या. आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करा. ही प्रक्रिया दोन्ही बाजूंनी ठराविक वेळा केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास फायदा होतो.

आडवे ताडासन – पार्श्वभाग कमी करायचा असल्यास हे आसन उपयुक्त आहे. उभे राहून दोन्ही पायात थोडे अंतर घ्या. दोन्ही हात वर घेऊन बाजूला जितके शक्य आहे तितके वाका. हीच क्रिया दुसऱ्या बाजूनेही करा.

कपालभाती – लठ्ठपणा कमी करण्यासाठी कपालभाती ही क्रिया उपयुक्त असते. दररोज ५ ते १५ मिनीटांसाठी कपालभाती केल्यास वाढलेले वजन कमी होण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो. कपालभाती करताना सिद्धासन किंवा पद्मासनात बसणे आवश्यक आहे. मात्र ज्यांना हृदयरोग किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तसेच अल्सर आणि कंबरदुखीचा त्रास असल्यास कपालभाती करणे तोट्याचे ठरु शकते.

आसनांचा वाढलेले वजन कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होतो. मात्र कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना त्याबाबत योग्य ती माहिती घेऊन मगच ते करावे अन्यथा त्यामुळे त्रास उद्भवण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या घाईमध्ये आसनांचा अतिरेक किंवा चुकीच्या पद्धतीने ही आसने न करता तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊन केलेली चांगली असे फिटनेस अभ्यासक मनाली मगर यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 3:12 pm

Web Title: these yogasan are best treatment for obesity
Next Stories
1 ‘या’ गोष्टींमुळे तुमच्या डोळ्याखाली येतात काळी वर्तुळं
2 स्नायूंची ताकद वाढवायची आहे? झोपण्यापूर्वी खा ‘हे’ पदार्थ
3 कर्करोग निदानासाठी स्वस्त रक्तचाचणी
Just Now!
X