चांगला आर्थिक परतावा मिळवण्यासाठी आणि आपल्या पोर्टफोलिओत वैविध्य आणण्यासाठी म्युचुअल फंड हा एक फायदेशीर मार्ग आहे. म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे दोन मार्ग आहेत: एसआयपी आणि एकरकमी गुंतवणूक. यातील नेमका मार्ग निवडण्यासाठी तुमच्याकडे एका वेळस गुंतवणूक करण्याएवढाच पैसा आहे, किंवा तुमचा बराचसा पैसा तुमच्या बचत खात्यात नुसताच पडून आहे हे पाहावे लागते. एसआयपीच्या मार्गात तुम्हाला बाजार अनुकूल आहे किंवा नाही हे पाहावे लागत नाही. तसेच या मार्गाने दीर्घ मुदतीत गुंतवणूक केल्यास बाजारात होणाऱ्या चढ-उतराचा विपरीत परिणाम होत नाही. पण एकरकमी गुंतवणूक करताना मात्र काही गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवे.

आर्थिक उद्दिष्टाप्रमाणे गुंतवणूक करा

फंडांची निवड तुमच्या आर्थिक उद्दिष्टांना अनुसरूनच करा. इक्विटी फंडांपासून दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो, तरीही अल्प मुदतीच्या गरजांसाठी काही पैसा लिक्विड फंडांमध्ये ठेवा. जर तुम्ही ईएलएसएस मध्ये पैसा गुंतवला, तर तो तुम्हाला किमान तीन वर्षे काढता येणार नाही. उदाहरणार्थ, तुमची अल्प मुदतीची गरज (१ वर्षापेक्षा कमी) आहे आणि ९ महिन्यांनंतर बाईक विकत घेण्यासाठी १ लाख रुपये, तसेच पाच वर्षांनंतर घर खरेदी करण्याचा विचार करीत आहात आणि त्यासाठी तुम्हाला ७ लाख आगाऊ रकमेसाठी लागतील. तुम्हाला हा सगळा पैसा म्युचुअल फंडांमध्ये गुंतवायचा आहे. अशावेळी हा सर्व पैसा एकरकमी एकाच फंडात न ठेवता तुम्ही ९५ हजार लिक्विड म्युचुअल फंडामध्ये ठेवू शकता ज्यावर तुम्हाला साधारण ७.५ टक्के वार्षिक परतावा मिळेल. त्यामुळे बाईक खरेदीसाठी तुम्हाला योग्य वेळी १ लाख रुपये मिळतील. उर्वरित ४ लाख तुम्ही पाच वर्षांसाठी बॅलेन्स फंडामध्ये गुंतवू शकता ज्यावर अंदाजे १२ टक्के परतावा मिळून पाच वर्षांत ही रक्कम ७.३५ लाख होऊ शकेल.

कर-दायित्वाचे भान ठेवा

म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना परतावा किती मिळेल, यासोबतच त्यावर कर किती द्यावा लागेल याचाही विचार करा. इक्विटी म्युचुअल फंड आणि डेट म्युचुअल फंडांना कर आकारणीच्या दृष्टीने वेगळ्या पद्धती लागू पडतात. इक्विटी म्युचुअल फंडांवरील अल्पकालिन भांडवली नफ्यावर १५ टक्के कर बसतो आणि १ लाखापेक्षा अधिक दीर्घकालिन भांडवली नफ्यावर १० टक्के कर बसतो. (इक्विटी म्युचुअल फंडांवरील १ लाखापेक्षा कमी दीर्घकालिन भांडवली नफा करमुक्त आहे.) डेट फंडांवरील अल्पकालिन भांडवली नफा तुमच्या एकूण मिळकतीत जोडला जातो आणि त्याप्रमाणे त्यावर कर आकारला जातो. तसेच डेट फंडांवरील दीर्घकालिन भांडवली नफ्यावर कराचा दर २० टक्के असून त्यावर सूचीकरण म्हणजेच इंडेक्सेशनचा फायदा मिळतो.

योग्य वेळेवर गुंतवणूक करा

जेव्हा तुम्ही एकरकमी गुंतवणूक करण्याचा विचार करता, तेव्हा नुकसान टाळण्यासाठी बाजाराचा कल ओळखून घ्या. तुम्ही इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूक करीत असलात, आणि त्या फंडाची नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) खूप जास्त असेल, तर तुम्ही काही काळ थांबू शकता. जर एनएव्ही सर्वोच्च स्तरावर असली, तर तिच्या कमी होण्याची वाट पाहा. जर तुम्हाला बाजाराचा कल कळत नसेल, तर पैसा एखाद्या लिक्विड फंडामध्ये गुंतवा आणि बाजाराची स्थिती स्पष्ट होईपर्यंत सुरक्षित परतावा मिळवा. ही गुंतवणूक घाई-गडबडीत करू नका.

एकाच फंडामध्ये सर्व पैसा गुंतवू नका

इंग्रजीची म्हण आहेच, “डोंट पुट ऑल एग्ज इन वन बास्केट” म्हणजेच एकाच ठिकाणी सर्व पैसा ठेवणे सुज्ञपणाचे लक्षण नाही. जोखीम कमी करून परतावा वाढवण्यासाठी तुम्ही अनेक ठिकाणी पैसा गुंतवला पाहिजे. उदाहरणार्थ, तुमची सर्व गुंतवणूक एकाच म्युचुअल फंड कंपनीच्या लार्ज-कॅप इक्विटी फंडात करण्याऐवजी एकापेक्षा अधिक कंपनींच्या लार्ज-कॅप, मल्टी-कॅप आणि डेट फंडांत गुंतवून, तुम्ही अधिक परतावा मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. प्रत्येक फंडाचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड पाहा आणि नंतरच गुंतवणुकीसाठी फंड निवडा.

योग्य वेळी नफा काढून घ्या

एसआयपीचा मार्ग तुमच्या गुंतवणुकीची सरासरी किंमत कमी करतो आणि त्यामुळे बाजाराच्या चढ-उतारापासून काही अंशी गुंतवणूक सुरक्षित राहते. एकरकमी गुंतवणूक करताना तुम्ही एखाद्या फंडाच्या यूनिट्स एकाच वेळी, एकाच किंमतीवर, त्या दिवशीच्या एनएव्ही वर खरेदी करता. एकरकमी गुंतवणुकीवर भरघोस नफा घेण्यासाठी बाजार सुस्थितीत असताना तुम्हाला ती गुंतवणूक काढून घेणे गरजेचे असते. म्हणूनच, तुम्हाला बाजाराकडे लक्ष ठेवावे लागते.

तसेच, तुमचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबरोबर तुम्हाला फंडातून पैसा काढून घ्यायला हवा, जरी तसे केल्याने तुम्ही तुमची गुंतवणूक आधी ठरवलेल्या मुदती आधी काढीत असलात, तरी हरकत नसते. योग्य नफा मिळाल्यावर तुम्ही हा पैसा उर्वरित मुदतीसाठी कमी जोखमीच्या गुंतवणुकीत ठेवू शकता ज्याने जोखीम कमी असताना त्यावर काही परतावा मिळत राहील. पण एका ठराविक मुदतीच्या आधी जर पैसा काढून घेतला, तर त्यावर कर अधिक आकारला जाऊ शकतो ज्याने तुमचा नफा कमी होतो.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार