वैयक्तिक कर्ज घेणे आता म्हणावे तितके अवघड राहीले नाही. तसेच घेतलेले कर्ज भरण्याची क्षमता काही प्रमाणात वाढल्याने लोक सर्रास कर्ज घेणे पसंत करतात. कर्ज घेण्याच्या वाढत्या प्रमाणामागे काही कारणे आहेत ती म्हणजे फार कठोर नसलेले नियम, लगेच पैसे मिळणे आणि सोप्या रीतीने पैसा हाती येणे. काही बँका तर अर्ज मिळाल्यानंतर काही मिनिटांतच पैसा तुमच्या खात्यात येईल अशी हमी देतात. हे कर्ज असुरक्षित मानले जाते कारण यासाठी कुठलाही जामीन द्यावा लागत नाही. म्हणूनच यावरील व्याजाचा दर इतर सुरक्षित कर्जांपेक्षा अधिक असतो. कर्जाची मुदत, आकडा, तुमची मिळकत, क्रेडिट स्कोअर इत्यादी गोष्टींवर व्यक्तिगत कर्जाच्या व्याजाचा दर अवलंबून असतो. मात्र वैयक्तिक कर्ज घेताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.

बँकेची निवड करताना सावधगिरी बाळगा

आज बाजारात अनेक कर्जदाते आहेत जे वैयक्तिक कर्ज देतात. तसेच आपल्यातील अनेकांना एसएमएस आणि ईमेल द्वारे अनेक ऑफर्स येत असतात. डोळे मिटून यातील कुठलीही ऑफर घेऊ नका. तुमचे खाते असलेल्या बँकेकडून तुमच्यासाठी पूर्व-मंजूर कर्ज घेणे तुम्हाला अगदी सोपे वाटू शकते. पण चांगल्या डील साठी अनेक बँकांच्या ऑफर्सची तुलना करा आणि नंतरच तुम्हाला हवा असलेला व्यवहार नक्की करा.

तुमची कर्ज-पात्रता पाहा

बँकेकडे अर्ज करण्याआधी तुम्हाला अपेक्षित असलेल्या रकमेचे कर्ज मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात किंवा नाही हे तपासा. अनेक वेळा लोकांना या कारणामुळेच बँका कर्ज देण्यास नकार देतात. अशा वेळेस तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा खाली येतो. वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्याआधी तुमचा क्रेडिट स्कोअर पाहा, अशाने तुम्हाला तुमची कर्ज-पात्रता कळेल. तुमच्या कर्जावरील व्याजाचा दर ठरवण्यासाठी, किंबहुना कर्ज मंजूर करायचे किंवा नाही हे ठरवण्यासाठी सुद्धा बँका तुमचा क्रेडिट स्कोअर पाहातात.

सर्वात कमी व्याजाचा दर शोधा

वैयक्तिक कर्ज कुठून घ्यायचे हे ठरवण्याआधी सर्व बँका आणि वित्तीय संस्थांचे व्याज दर पाहून घ्या. सरसकट व्याज दराकडे लक्ष ठेवा, कारण अशा दरामध्ये प्रत्येक हप्त्यानंतर कमी होणाऱ्या मुदलाकवर व्याज आकारले जात नाही. उदाहरणार्थ, जर १ लाखाच्या कर्जावर दोन वर्षांसाठी १४ टक्के वार्षिक व्याज असेल, तर कमी होणाऱ्या मुदलाच्या दराने एकूण व्याज १५,२३० एवढे बसेल. याचा सरसकट दर काढल्यास तो ७.६ टक्के वार्षिक बसतो.

इतर फी आणि दंड

वैयक्तिक कर्जासाठी साधारणपणे १ ते २ टक्के प्रोसेसिंग फी आकारली जाते. याशिवाय इतर खर्च जसे स्टॅम्प ड्यूटी, दस्तऐवज चार्ज इत्यादी असू शकतात, तसेच मुदतीआधी परतफेड केल्यास दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो. सर्व अटी व शर्ती आधी नीट वाचून घ्या.

वारंवार अर्ज करणे टाळा

एखाद्या बँकेकडून एकदा जर तुमचा अर्ज फेटाळला गेला असेल, तर मंजूर होण्याच्या आशेने पुन्हा पुन्हा अर्ज करणे टाळा. असुरक्षित कर्जासाठी अनेक वेळा अर्ज केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. कारण अशाने तुम्ही कर्जासाठी आसुसलेले दिसता. यापेक्षा तुमचा क्रेडिट रिपोर्ट पाहा आणि तुमचा स्कोअर कमी होण्याची कारणे शोधा. स्कोअर वाढवण्यासाठी आवश्यक ते करा आणि नंतर कर्जासाठी अर्ज करा.

परवडत असलेल्या रकमेपेक्षा अधिक रकमेचे कर्ज घेऊ नका

लक्षात ठेवा, कर्ज तुम्हाला आर्थिक अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी, तसेच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक महत्वाचे साधन आहे. त्याच्या परतफेडीसाठी नियमित हप्ते भरावे लागतात. म्हणूनच, कर्ज घेण्याआधी स्वतःची परतफेडीची क्षमता पाहा आणि आपले खर्च भागवले जातील आणि गुंतवणुकी सुरू राहातील याची खात्री करा. अशा कर्जाचा तुमच्यावर भार होता कामा नये कारण जर परतफेड आवाक्याबाहेर झाली, तर तुम्ही कर्जाच्या चक्रात सापडू शकता. अशाने तुमचा क्रेडिट स्कोअर तर कमी होतोच, तुम्हाला भविष्यात इतर कर्ज घेताना सुद्धा अडचण येऊ शकते.

आदिल शेट्टी
सीईओ, बँकबझार