मागील ४ दिवसांपासून मुंबईला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पाऊस पडला की एखादवेळी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या मिळतात. पण ऑफीसला जाणाऱ्यांना पर्यायच नसतो. मग एखादवेळी प्रवासाचे माध्यम बदलले जाते मात्र ऑफीसला जावेच लागते. एखाद्या भागात जास्त पाऊस असेल तर ऑफीसला पोहोचायला अनेकांना उशीर होतो, कधी आपण रेल्वेत बराच काळ अडकून पडतो तर कधी पाण्यातून वाट काढत ऑफीस गाठतो. पण हे सगळे करताना आपल्याकडे छत्री आणि रेनकोट असेल तरीही आपण भिजतोच. अशावेळी कधी एकदा कोरड्या ठिकाणी पोहोचतोय असं होऊन गेलेलं असतं. इतक्या सगळ्या गोष्टी करुन आल्यावरही आपल्याला काम मात्र करायचंच असतं. एकीकडे कपडे ओले झालेले असतात, कधी ओलं झाल्यानी थंडीही भरलेली असते. तर कधी आणखी काही तक्रारी. पण अशा सगळ्या गोष्टी केल्यावरही तब्येत जपायची असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पाहूयात कोणत्या आहेत त्या गोष्टी…

कपडे सुकवा नाहीतर एक जोड ऑफीसला आणून ठेवा – मुंबईमध्ये किंवा अगदी इतरही ठिकाणी पावसाचा जोर जास्त असेल तर आपण कपडे कितीही जपले तरी ते ओले होतातच. अशाप्रकारे ओले झालेले कपडे लवकर वाळत नाहीत. सध्या बऱ्याचशा ऑफीसमध्ये एसी असतात. या ओल्या कपड्यांनी एसीमध्ये बसल्यास आणखी गारठा जाणवतो. अशावेळी कपडे पिळून किंवा इतर कोणत्या पद्धतीने वाळवणे आवश्यक असते. याला आणखी एक चांगला पर्याय म्हणजे कपड्यांचा एक जास्तीचा जोड पावसाच्या दिवसांत ऑफीसमध्ये आणून ठेवल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो.

त्वचेची काळजी घ्या – दिर्घकाळ पाय पाण्यात राहील्यास त्वचेच्या काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच या पाण्यात असणारे काही घटक त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात. या पाण्यात असणारे किडे किंवा इतर सजीव यांमुळे त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पाण्यातून आल्यावर पाय स्वच्छ धुवावेत.

केस ओले ठेवू नका – पावसातून आल्यावर अनेकदा केसही ओले होतात. अशा ओल्या केसांनी बसून राहणे आरोग्यासाठी चांगले नसते. हे पाणी डोक्यात मुरल्याने सर्दी-खोकल्यासारखे आजार होतात. तसेच केसांचा पोत खराब होतो. विशेषत: मुलींनी ही ओले केस विंचरले किंवा बांधून ठेवले तर त्याचे त्रास होऊ शकतात.

आहाराबाबत काळजी घ्या – पावसाळ्यात हवेत गारवा असल्याने जास्त वेळा लघवीला जावे लागते. मात्र लघवी लागल्यावर वेळीच जाऊन या. तसेच जास्त पाणी प्यायल्यावर सारखे लघवीला जावे लागते म्हणून पाणी पिणे टाळू नका. बाहेरच्या खाण्यामुळे पावसाच्या दिवसांत काही संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरचे खाणे टाळा. पाणी उकळून प्या.