‘ये ऑनलाइन का जमाना है’ ! असं म्हणत आजची तरुणाई लहानसहान गोष्टींसाठीदेखील ऑनलाइन साईट आधार घेताना दिसतात. एकाच जागेवर बसून एखाद्या गोष्टीच्या हजारो व्हरायटी या साईटवर मिळत असतात. त्यामुळे सध्या पाहायला गेलं तर अनेक जण ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडतात. अगदी कपड्यांपासून ते घरात लागणाऱ्या लहानसहान गोष्टीही येथे मिळतात. त्यातच तरुणाईला आकर्षित करतील अशा वस्तूही येथे असतात. मात्र या वस्तू खरेदी करत असताना तिची सत्यता तपासणे गरजेचे असते. अनेकवेळा आपण घेतलेल्या या वस्तू प्रत्याक्षात भ्रमनिरास करणाऱ्या ठरतात. त्यातच ड्रेस किंवा चप्पल यांच्या खरेदी करताना विशेष लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे चप्पलांची ऑनलाइन खरेदी करताना काही टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमची ऑर्डर घरी आल्यानंतर तुमचा भ्रमनिरास होणार नाही –

१. योग्य मापाची निवड – ऑनलाइन चप्पल खरेदी करताना सर्वात मोठी समस्या येते ती चप्पलांच्या योग्य मापाची. अनेक वेळा चुकीचं माप निवडल्यामुळे या चप्पला होत नाहीत. त्यामुळे ऑनलाइन चप्पल मागवत असताना साइटवर दिलेली गाइडलाइन नीट वाचावी. त्यासोबतच प्रत्येक ब्रॅण्डनुसार त्यांचा साइज चार्टदेखील वेगवेगळा असतो. त्यामुळे कायम गाइडलाइनचा वापर करावा.

२. स्टाईल नव्हे आरामदायीपणा पाहा –
बदलत्या काळानुसार युथ आपली फॅशनस्टाईल बदलताना दिसतात. युथला व्हारायटी हवी असते. त्यामुळे ते ऑनलाइन खरेदीचा पर्याय निवडतात. या ऑनलाइन साइटवर वेगवेगळ्या डिझाइनच्या, ब्रॅण्डच्या चप्पला आपल्यासमोर असतात. त्यामुळे अनेक वेळा आपल्या डोळ्याला जे आवडेल त्याची आपण निवड करतो. मात्र डोळ्यांना आवडण्यापेक्षा आपल्या पायाला ज्या आरामदायी असतील त्या चप्पलांची निवड करावी. अनेक वेळा फॅशनच्या नादात आपण चुकीच्या वस्तू निवडतो. परिणामी, आपल्याला पायदुखी किंवा कंबरदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. यामुळेच चप्पल खरेदी करताना आपल्या पायाला जे आरामदायी वाटेल अशाच चप्पलांची निवड करावी.

३. उत्पादनाची गुणवत्ता – आपण ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी करतो. त्यावेळी त्या वस्तूविषयीची काही वैशिष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. चप्पल खरेदी करताना तिचं मटेरियल, उंची तपासून पहावी. त्यासोबत लोकांनी दिलेली रिव्ह्युज देखील एकदा पाहावेत.

४. घरी एकदा वापरुन पाहा – नवीन चप्पल घेतल्यानंतर ती लगेच वापारायला न काढता प्रथम घरी एकदा वापरुन पाहावी. जर घरी तुम्हाला चालताना कोणती अडचण येत नसेल तरच ती वापरायला काढावी. अन्यथा रस्त्याने चालताना तुम्हीला अडचणी येऊ शकतात. त्यासोबतच चप्पल किती आरामदायी आहे याचाही अंदाज येतो. विशेष म्हणजे एकदा वापर झालेली वस्तू कंपनीदेखील परत घेणार नाही. त्यामुळे तुमचे पैसेदेखील वाया जाऊ शकतात.