वाढलेले वजन कमी करणे हा लठ्ठ लोकांसाठी एक प्रकारचा टास्कच असतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी मग तऱ्हेतऱ्हेचे उपाय केले जातात. कधी डाएट करुन तर कधी जोरदार व्यायाम करुन वजन कमी करण्याचा घाट घातला जातो. वाढत्या वजनामुळे शारीरिक त्रासांबरोबरच मानसिक त्रासही होतात. जाड असल्याने होणारी चिडवाचिडवी, लग्न न ठरण्याची तक्रार, तर कधी आपण बेढब दिसत असल्याने येणारी निराशा. यामध्ये आहाराचा भाग हा महत्त्वाचा असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण कोणते पदार्थ सोबत खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते सांगितले आहे अविनव वर्मा यांनी….

ऑम्लेट आणि बेरी

अंड्याचे ऑम्लेट हे आरोग्यासाठी कधीही चांगले असते. करायला सोपे आणि अनेक पोषक घटकांनी युक्त ऑम्लेट तुमच्या आहारात असायलाच हवे. पण यासोबत तुम्ही बेरी हे फळ खाल्ले तर वजन कमी होण्यास निश्चितच मदत होते. या दोन्ही पदार्थांतील घटक हे एकमेकांवर परिणाम करणारे असल्याने वजन कमी होते.

दही आणि दालचिनी

तुम्हाला पोटावर वाढलेली चरबी कमी करायची असेल तर दही अतिशय उपयुक्त ठरते. दह्यामध्ये आणि दालचिनीमध्ये असणारे क जीवनसत्त्व आणि कॅल्शियम यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दह्यात दालचिनीची पूड घालून खा.

दालचिनी आणि कॉफी

अनेकांना ठराविक वेळाने कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीमुळे आरोग्याला अनेक अपाय होतात असे आपण वारंवार ऐकतो. कामाच्या ताणातून आराम मिळावा यासाठी अनेकजण कॉफी पितात पण याच कॉफीमध्ये थोडीशी दालचिनी घातली तर दोन्हीची एकमेकांवर चांगली प्रक्रिया होऊन चरबी आणि पर्यायाने वजन घटण्यास मदत होते.

दही आणि बदाम

दही आणि बदाम या दोन्ही पदार्थांमध्ये अ,ड आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. या घटकांमुळे शरीराचा मेटाबॉलिक रेट वाढतो. पण या दोघांचे कॉम्बिनेशन केले तर वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. ही काही उदाहरणे आहेत मात्र याशिवाय इतरही अनेक अशा कॉम्बिनेशन्स आहेत ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.