वेगळे फ्लेवर्स आणि मसाल्यांचा योग्य वापर तुमच्या साध्याशा पदार्थामध्ये देखील मोठी रंगत आणतात. विशेष म्हणजे आपल्या पदार्थांवर जादू करणारे, एक नवी चव देणारे हे पदार्थ काही फार महागडे किंवा दुर्मिळ नसतात. मात्र, आपल्याच आजूबाजूला आणि जवळपास सहज मिळणाऱ्या या पदार्थांचा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वापर करणं आपल्या हातात असतं. दरम्यान, आता आपल्या खाद्यपदार्थांना नवी चव आणि ओळख देण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या टिप्स देणाऱ्या शेफ सारांश गोएला यांनी नुकतीच आणखी एक सुपर रेसिपी शेअर केली आहे. ओरेगॅनो आणि बेसिलच्या तेलाचा विविध खाद्यपदार्थांमधील वापर आता प्रचंड प्रसिद्ध आहे. मात्र, ह्या कौतुकात आपण आपल्या अगदी जवळचा आणि दररोजच्या वापरातला एक पदार्थ विसरतो. तो पदार्थ म्हणजे कढीपत्ता! शेफ सारांश गोएला यांनी याच कढीपत्त्याच्या तेलाची एक अत्यंत चविष्ट आणि सोपी रेसिपी शेअर केली आहे. खिचडीपासून पिझ्झापर्यंत अनेक पदार्थांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता.

तुमच्या पदार्थांना कढीपत्त्याच्या तेलानं एक अप्रतिम चव आणण्यासाठी शेफ सारांश यांनी सांगितलेली झटपट आणि सोपी कृती नेमकी काय आहे? पाहूया.

कढीपत्त्याच्या तेलासाठी लागणारं साहित्य

  • कढीपत्ता – १ वाटी
  • खोबऱ्याचं तेल – १ वाटी

कृती

  • १ वाटी कढीपत्ता १ कप तेलात तळून घ्या.
  • पानं जास्त प्रमाणात भाजली जाणार नाहीत याची काळजी घ्या.
  • हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्या.
  • मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या.
  • बारीक करून घेतलेलं हे मिश्रण गाळून घ्या.
  •  तुमचं कढीपत्त्याचं तेल तयार झालं.

टीप :

तुम्हाला जर या तेलाची चव आणखी तीव्र हवी असेल तर कढीपत्त्याची पानं आणि तेलाचं हे मिश्रण बारीक करण्यापूर्वी आठवड्याभरासाठी तसेच ठेवून द्या, असे शेफ सांगतात.

खरंतर, आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने कोणत्याही फोडणीमध्ये कढीपत्त्याचा वापर करून पदार्थाची चव वाढवत होतो. मात्र, आता थेट कढीपत्त्याच्याच तेलाचा वापर करता येईल. त्यामुळे, ही नवी रेसिपी नक्की करून पहा.