19 March 2019

News Flash

फेशियल करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेची काळजी घेणे गरजेचे

प्रातिनिधिक छायाचित्र

फेशियल करणे ही हल्ली अनेकांसाठी सामान्य गोष्ट झाली आहे. कधी चेहरा खराब झाला म्हणून तर कधी थकवा आला म्हणून फेशियल केले जाते. याचा रक्ताभिसरण क्रिया चांगली होण्याबरोबरच चेहरा ताजातवाना दिसण्यासाठी आणि चेहऱ्याची त्वचा नितळ दिसण्यासाठी उपयोग होतो. चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्याने त्याची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. सध्या महिलांबरोबरच पुरुषांमध्येही फेशियल करण्याचा ट्रेंड वाढत आहे. सुरुवातीला फेसपॅक लावून मग मसाज करुन आणि विविध क्रीम्सचा वापर करुन ही त्वचा चांगली करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र फेशियल हाच सर्व गोष्टींवरील उत्तम उपाय असल्याचे ठरवत त्यालाच प्राधान्य दिले जाते. फेशियलमुळे त्वचा स्वच्छ होते. त्यावरील मृत भाग बाहेर जाण्यास मदत होते तसेच त्वचेचे पोषण होण्यासही फेशियलमुळे मदत होते. याबरोबरच वाढलेले वय लपवण्यासाठीही फेशियलचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे फेशियल चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगले असले तरीही ते करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत. पाहूयात काय आहेत या गोष्टी…

तुमच्या त्वचेला सूट होईल असे फेशियल निवडा

फेशियलमध्ये बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात. यामध्ये स्थानिक ब्रँडपासून ते मोठ्या ब्रॅंडपर्यंत विविध पर्याय उपलब्ध असतात. पण चेहऱ्याची त्वचा ही अतिशय नाजूक असते त्यामुळे तिची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते. म्हणूनच फेशियल करण्याआधी तुमच्या त्वचेला कोणते फेशियल यूट होईल याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणेच फेशियल निवडा. तुमची त्वचा तेलकट असेल तर मॉईश्चरायझिंग फेशियल तुम्हाला चालणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या त्वचेचा पोत कोरडा असेल तर त्वचा आणखी कोरडी पडेल असे फेशियल निवडू नका.

फेशियलआधी वॅक्सिंग आणि शेव्हिंग करु नका

वॅक्सिंग आणि शेव्हिंगमुळे त्वचेची काही प्रमाणात आग होण्याची शक्यता असते. त्यावर फेशियल केल्यास चेहऱ्यावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. फेशियलमध्ये असणारा मसाज आणि इतर गोष्टींमुळे चेहऱ्यावर रॅशेस येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे फेशियल करण्याआधी चुकूनही वॅक्सिंग किंवा फेशियल करु नका.

चेहऱ्याला काहीही न लावता फेशियल करण्यासाठी जा

तुम्ही चेहऱ्याला एखादे क्रीम किंवा मेकअपमधील काही लावले असल्यास फेशियल करण्यास त्रास होतो. त्यामुळे पार्लरमध्ये फेशियल करायला जाताना चेहऱ्यावर कोणतेही क्रिम, पावडर किंवा इतर काही नसेल याची काळजी घ्या. एखादा घटक चेहऱ्यावर आधीपासून असेल आणि त्यावर फेशियल केल्यास त्वचेच्या तक्रारी उद्भवण्याचीही शक्यता असते.

फेशियलआधी आणि नंतर उन्हात जाणे टाळा

सूर्यकिरणांमुळे त्वचा खराब होते. त्यामुळे फेशियलला जाताना चेहऱ्याला उन लागणार नाही याची काळजी घ्या. तसेच फेशियलमुळे चेहऱ्यावरील रंध्रे उघडली जातात. अशा चेहऱ्यावर उन लागल्यास चेहऱ्याची आग होणे, त्वचा लाल होणे असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे थेट उन लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

First Published on March 14, 2018 11:47 am

Web Title: this things you should keep in mind before doing facial