ट्विटरचा प्रतिस्पर्धी असणाऱ्या KOO अ‍ॅपमध्ये टायगर ग्लोबलच्या नेतृत्वात गुंतवणूकदारांनी तब्बल तीन कोटी अमेरिकन डॉलरची (जवळपास २१८ कोटी) गुतंवणूक केली आहे. सध्या असलेल्या गुंतवणूकदारांच्या एक्सेल पार्टनर्स, कलारी कॅपिटल, ब्ल्यू वेंचर्स आणि ड्रीम इनक्यूबेटर यांनीही यामध्ये गुंतवणूक केली आहे, असे KOO तर्फे दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. आयआयएफएल आणि मिराई अ‍ॅसेट या दोन नविन गुतंवणूकदारांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

सोशल मीडिया, डिजिटल न्यूज पोर्टल, ओटीटी यांवरून प्रसारित मजकुराबाबतच्या तक्रारींचे निवारण आणि कारवाई करण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणी करण्यास सरकारने सांगितले होते. मात्र फेसबुकचा अपवाद वगळता सोशल मीडियावरील अ‍ॅपने आतापर्यंत या नियमावली लागू केलेली नाही. अशा परिस्थिती KOO मध्ये इतक्या मोठ्या स्वरुपात गुंतवणूक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये Koo डाउनलोड करणाऱ्यांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. Koo वापरकर्त्यांचा आकडा ६० लाखांपार गेला आहे. नवीन नियमांच्या अनुषंगाने आपण गोपनीयता धोरण, वापरण्याच्या अटींमध्ये बदल केले असल्याचे नविन नियम लागू करताना Koo ने सांगितले आहे.

यामधील वैयक्तिक धोरण, वापर अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे ही सोशल मीडियासाठी लागू असलेल्या नियमांचे पालन करते असे Koo ने गेल्या शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याव्यतिरिक्त, तपासणी आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी यंत्रणा सुरू केली आहे. भारतील एक मुख्य अधिकारी आणि एक नोडल अधिकारी यावर लक्ष ठेवतील असे Koo ने म्हटले आहे.

Koo अ‍ॅप अप्रम्या राधाकृष्णा (Aprameya Radhakrishna) आणि मयंक बिदावत्क (Mayank Bidawatka) यांनी मार्च २०२० मध्ये डेव्हलप केलं आहे. Koo अ‍ॅपने ऑगस्ट २०२० मध्ये भारत सरकारकडून आयोजित Aatmanirbhar App Challenge स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकल्यापासून डाउनलोडिंगचं प्रमाण चार पटीने वाढलं असं कंपनीचे संस्थापक मयंक बिदावत्क यांनी सांगितलं. तर, गेल्या काही दिवसांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी Koo अ‍ॅप वर अकाउंट बनवल्यापासून Koo डाउनलोड करणाऱ्यांची वाढल्याचा दावा त्यांनी केला.

काय आहे Koo अ‍ॅप?

Koo अ‍ॅप आत्मनिर्भर भारत अ‍ॅप्लिकेशन चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता. Koo चा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातही केला होता. Koo अ‍ॅपवर भारतीय भाषांमध्ये ट्विटरप्रमाणे माइक्रोब्लॉगिंगचा अनुभव मिळतो. सोप्या शब्दात सांगायचं तर Koo म्हणजे ‘मेड इन इंडिया’ ट्विटर आहे. हिंदी, इंग्रजी, मराठीसह आठ भारतीय भाषांचा सपोर्ट या अ‍ॅपमध्ये आहे. Koo चा वापर अ‍ॅपसोबतच वेबसाइटवरुनही करता येतो. याचा इंटरफेस ट्विटरप्रमाणेच असून शब्दांची मर्यादा ३५० आहे. ट्विटरप्रमाणेच Koo वर युजर्सना फॉलो करण्याचा पर्याय आहे. Koo वर भारतीय भाषांमध्ये विचार व्यक्त करण्याची सोय आहे.