मुली नेहमीच त्यांच्या हेअरकट विषयी काळजी करत असतात. हेअरकट हा ट्रेण्डी तर हवाच पण तो तुमच्या चेह-याला साजेसादेखील असावा. चेह-याच्या रचनेप्रमाणे हेअरकटची निवड करावी. काही मुलींच्या केसांची वाढ उत्तम असल्याने त्या दर सहा महिन्यांनी केस कापतात आणि नवा लूक त्यांना मिळतो. पण, ज्या मुलींच्या केसांची वाढ कमी असते त्यांना फार विचार करून हेअरकट करावा लागतो. अशावेळी, तुमच्या चेह-याला साजेसा हेअरकट करणे फार गरजेचे असते. चेहर्‍याला शोभून न दिसणारा हेअरकट केला तर व्यक्तिमत्त्व उठावदार दिसत आही. तुमच्या चेह-याप्रमाणे त्याला शोभेल अशा हेअरकटसाठी काही टिप्सः
१. ज्या मुलींचा चेहरा उभट असेल त्यांनी हनुवटीपर्यंत असा बॉबकट ठेवल्यास त्या खुलून दिसतात. विशेषकरून कुरळे केस असणा-या मुली यात जास्त शोभून दिसतात.
२. बदामी आकाराचा चेहरा असलेल्या मुलींनी डोळे आणि गालाची ठेवण लक्षात घेऊन टोकदार हनुवटी झाकण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी लांब केस ठेवून कपाळावर काही बटा काढल्यास त्या सुंदर दिसतात.
३. लांबसडक केस असणा-यांनी लेअर कट करावा.
४. चेहरा जर आयताकृती असेल तर कर्ली किंवा चॉपी कट केल्याने चेह-याचे सौंदर्य खुलते.
५. ज्यांचे केस लहान असतील त्यांनी केस कुरळे करण्याची चूक करु नये. मोठे केस असलेल्यांनी केसांचे ‘ पमिंग’ केले तरी चालेल. मात्र, ते त्यांच्या चेह-यानुरुप शोभत असेल तरच हा पर्याय निवडावा.
६. गोल चेह-याला अंडाकृती रुप देण्यासाठी चेह-याभोवती कमी केस ठेवावेत.
७. गोल चेह-याच्या मुलींनी एका बाजूला तिरप्या फ्लिक्स ठेवल्यास सुंदर दिसतात.
८. उभट चेह-याच्या मुलींनी कपाळाच्या मध्यभागी केसांचे फ्लिक्स ठेवू नयेत.
९. हल्ली प्रसिद्ध असलेली तिरपा भांग पाडण्याची पद्धतही बहुतेकजणींना उठून दिसते.
हेअरकट हा चेहरा खुलविण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतोच पण त्याचबरोबर केसांची योग्य ती काळजी आणि निगा राखण्यास विसरु नका. आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावावे. पंधरा दिवसांमधून एकदा तरी केसांना कंडिशनर लावून केस धुवा.