अजय महाडिक

चालक कितीही निष्णात असला तरीही वाहन चालवताना अनपेक्षित घटना कधी घडेल याचा नेम नसतो. अशा आणीबाणीत चालक गोंधळून जातो आणि जे घडू नये वाटते ते घडते. त्यामुळे आणीबाणीत वाहन कसे हाताळावे याची माहिती प्रत्येक वाहनचालकाला असणे गरजचे असते. याची जाण व कौशल्य असल्यास संभाव्य धोकाही टाळता येऊ शकतो.

अपघात होण्याची अनेक कारणे आहेत. त्यात अचानक चाक फुटल्याने होणारा गंभीर अपघात. वाहनाचे पुढील चाक अचानक फुटल्यास चाक फुटलेल्या दिशेने वाहन घसरण्यास सुरुवात होते. पाठीमागचे चाक फुटल्यास वाहन नागमोडी चालते. आशाप्रसंगी  घाबरून व गोंधळून न जाता, सुकाणूचक्रावरती (स्टेअिरग व्हिल) हाताची पकड घट्ट करावी व वाहन रस्त्यावर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा. घसरण्याच्या उलटय़ा दिशेला सुकाणू फिरवत राहण्याची क्रिया घडू शकते, पण तसे करू नये. सावधपणे ब्रेक लावावेत व वाहन शक्यतो रस्त्याच्या कडेला नेऊन थांबवावे. टायर फुटलेले चाक काढून त्या जागी स्टेपनी बसवावी.

अपघाताचा दुसरा प्रकार म्हणजे वेगवर्धिका अडकून बसते. पायाचा दाब काढला तरी ती पूर्वस्थितीत येत नाही व त्यामुळे वाहनाचा सतत अनावश्यक वेळ मिळत राहतो. अशा वेळी घाबरून न जाता गिअर्स कमी करत वाहनाची गती कमी करण्याचा प्रयत्न करा. वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूकडे नेऊन इंजिन बंद करा. जवळच्या वाहन दुरुस्ती करणाऱ्यास बोलवून वेगवर्धिका दुरुस्त करून घ्यावी.

अनेकदा वाहनाचे बोनेटचे कव्हर सुरक्षितरित्या बंद झाले नसल्यास आणि वाहन वेगात असल्यास ते उघडते. विरुद्ध दिशेच्या हवेच्या दाबामुळे असे घडते. त्यामुळे वाहनचालकास समोरचा रस्ता दिसणे अशक्य होते. अशावेळी घाबरून न जाता चालकाने वाहनाचा वेग आपल्या नियंत्रणात आणावा. त्यानंतर खिडकीतून वाहनांना योग्य ते संकेत देत वाहन डावीकडे न्यावे. बोनटचे झाकण सुरक्षितपणे बंद करावे.

अनेकदा यांत्रिक, विद्युत पुरवठय़ातील किंवा इंधन पुरवठय़ातील सदाष यंत्रणेमुळे चालू स्थितीतील वाहन बंद पडू शकते. अशावेळी वाहन रस्त्यावर असल्यास ते प्रथम डावीकडे घ्यावे. संकटकालीन दिवे (पार्किंग लाईट्स) कार्यान्वित करावेत. वाहनात प्रवासी असल्यास त्यांना उतरवून बोनट उघडून ठेवावे. वाहन सोडून जाण्याची वेळ आल्यास ते बंद करून पार्किंग लाईट्स सुरू कराव्यात.

कधीकधी मास्टर ब्रेक निकामी होणे, ब्रेक्स फ्यूइड पाइप फाटणे, प्रमाणापेक्षा कमी ब्रेक ऑईल असणे यामुळे ब्रेक गरम झाल्यामुळे निकामी होतात. अशा वेळी पायातील कळ सतत दाबत राहवी. गिअरवर वाहनाचा वेग नियंत्रित करून ते रस्त्याच्या डाव्या बाजूला घेणे. अशा वेळी आवशकता असल्याच हाताच्या ब्रेकचा वापर करावा. गाडीचे दिवे सुरू करावेत. सतत हॉर्न वाजवून इतरांना

योग्य ते इशारे द्यावेत. मात्र तरीही वाहन नियंत्रित होत नसेल तर रिव्हर्स गिअरचा वापर करावा. त्यामुळे पाठीमागची चाके बंदिस्त होऊन वेग नियंत्रणात येईल. या कृतीमुळे वाहनाची वाहनक्षमता (ट्रान्समिशन) बिघडते परंतु आणीबाणीच्या प्रसंगी ते नुकसान परवडेल.

वाहनाला आग लागणे

विद्युत पुरवठा यंत्रणेतील शॉर्टसक्रीटमुळे वाहनास आग लागू शकते. चालकाच्या किंवा सहप्रवाशांच्या धूम्रपानामुळेही गाडीच्या अंतर्गत भागाला आग लागू शकते. त्याचबरोबर इंधनातील गळतीसुद्धा वाहनाच्या आगीचे कारण असू शकते. अशा वेळेस कसलेला चालकही भांबावून जाऊ शकतो. सर्वात प्रथम वाहन डावीकडे घेऊन त्वरित बंद करावे. सहप्रवाशांना उतरवून त्यांना वाहनापासून लांब जाण्यास सांगावे. वाहनातील आग प्रतिबंधक नळकांडे (नेहमी सोबत असावे) घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करावा. बोनेट उघडून बॅटरीच्या तारा काढता येत असल्यास काढून टाकाव्यात. एखादी वायर जळत असल्यास ती तोडावी. आग विझत नसल्यास वाहनापासून दूर जावे.

भरधाव स्थितीत वाहन घसरणे

वाहन वेगात असताना अचानक ब्रेक लावणे किंवा अचानक वेग वाढणे अशा कारणांनी वाहनाचे एखादे किंवा सगळीच चाके रस्त्याची पकड सोडतात. आणि वाहन इच्छित दिशेऐवजी भलतीकडेच घसरत जाते. अशा वेळी वाहन घसरतेय हे लक्षात येताच चालक ब्रेक दाबतो. असे करू नये. ब्रेकवरचा पाय काढावा. वाहन गिरकी घेत असल्यास ते पूर्ण वर्तळाकार फिरू द्यावे. हलके हलके ब्रेक लावण्याचा प्रयत्न करावा व ब्रेकवरील दाब वाढवावा. त्यामुळे वाहनाची चाके एकाएकी बंदिस्त होत नाहीत. वाहनाचे सुकाणूचक्र (स्टेअरिंग) घट्ट धरून वाहन रस्त्यावरच राहील असा प्रयत्न करावा.

पुढची चाके  : वाहनाचा वेग एकाकी वाढवल्यास विशेषत: कोपऱ्यावरची व गोलाकार चाकाभोवतीची वळणे वेग नियंत्रित न करता घेतल्यास पुढची चाके रस्त्यावरची पकड सोडतात.

काय कराल : वेगवर्धिकेवरील पार काढावा. सुकाणूचक्र घट्ट धरून पुढची चाके व एकंदरीत वाहन रस्त्याला धरून राहतील असे पाहवे. नंतर हलकेच ब्रेक लावावा व त्यावरील दाब हळूहळू वाढवावा

मागची चाके : भरधाव वाहनाला एकाकी ब्रेक लावल्यास किंवा रस्यावर बर्फ, तेल, रेती अथवा पाणी असल्यास असे घडते व वाहन गिरक्या घेऊ लागते व रस्ता सोडते.

काय कराल : वेगवर्धिकेवरील पार काढावा. वाहन ज्या दिशेने घसरत आहे त्याच्या विरूद्ध दिशेला सुकाणूचक्र फिरवण्याची क्रिया करू नये. हलके हलके ब्रेक लावावा व वाहन इच्छित दिशेला वळवावे.

चारही चाके : वेगात असलल्या वाहनास एकाएकी ब्रेक्स लावल्यास बऱ्याचदा चारही चाके रस्ता सोडतात. वाहन इच्छित मार्ग सोडून भलतीकडे जाते. वाहनाचा वेग अपोआप वाढत असल्याचा भास होतो.

काय कराल : वेगवर्धिकेवरील पार काढावा. सुकाणूचक्र घट्ट धरून पुढील चाके सरळ व रस्त्याला धरून राहतील असे पाहवे. हलके हलके ब्रेक लावावा व त्यावरील दाब सावकाश वाढवावा.