पाठदुखीच्या विविध प्रकारांचे विश्लेषण करून त्यांच्यावरील औषध योजना आणि उपचार पद्धती ही व्यक्तिनिहाय निश्चित करता येईल, अशा घटकांचा शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे.  पाठीचे दुखणे हे जगभरातच मोठय़ा प्रमाणावर आढळून येणारी आरोग्याची समस्या आहे.

याबाबतचा अभ्यास हा ‘आथ्र्रायटिस केअर अ‍ॅन्ड रिसर्च’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. पाठदुखीच्या विविध प्रकारांत रुग्णांमध्ये दिसून येणारी लक्षणे आणि त्यावरील उपचार पद्धती-औषधांची योजना (यात ओपिऑईडसचा म्हणजेच अफूवर्गीय वेदनाशामकांचा समावेश आहे.) यांची माहिती यात दिली आहे. कॅनडामधील १२ हजार ७८२ रुग्णांकडून १९९४ ते २०११ दरम्यान माहिती घेऊन हा अभ्यास करण्यात आला. या लोकांकडून प्रत्येकी दोन वर्षांनी त्यांचे पाठदुखीबाबतचे अनुभव जाणून घेण्यात आले. यामध्ये पाठदुखीमुळे होणाऱ्या वेदना, अपंगत्व, पाठदुखीशी निगडित इतर आजार आणि त्यांच्यावर घेतलेले औषधोपचार, डॉक्टरांच्या भेटी आदी माहिती जाणून घेण्यात आली. या १६ वर्षांमध्ये यापैकी निम्म्या लोकांना (४५.६ टक्के) कमीत कमी एकदा तरी पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यांच्यामध्ये पाठीत वेदना होण्याचे चार प्रकार आढळून आले. कायम राहणारी वेदना (१८ टक्के), वाढत जाणारे दुखणे (२८.१ टक्के), बरे झालेले दुखणे (२०.५ टक्के) आणि अधूनमधून होणाऱ्या वेदना (३३.४ टक्के) असे हे प्रकार आहेत.

पाठीत कायम वेदना राहणाऱ्या आणि वेदना हळूहळू वाढणाऱ्या गटातील रुग्णांना अन्य दोन गटांच्या तुलनेत अधिक वेदना आणि अपंगत्व जाणवत असल्याने त्यांनी अधिक औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला. वेदना थांबलेल्या गटातील व्यक्तींनी ओपिऑईडस आणि अ‍ॅन्टिडिप्रेसेंटसचा वापर वाढवल्याचे दिसून आले. पाहणी केलेल्या प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एक जण पाठदुखीतून बरा झाला होता, तर एकाचे दुखणे कायम होते. या वेगवेगळ्या गटांतील रुग्णांवर एकाच प्रकारचे उपचार सरधोपटपणे करण्याऐवजी वेगवेगळे उपचार करणे योग्य ठरते, असे कॅनडामधील ‘युनिव्हर्सिटी हेल्थ नेटवर्क’च्या ‘क्रेमलिन रीसर्च इन्स्टिटय़ू्ट’च्या माईली कॅनिझर्स यांनी सांगितले.