धुलिवंदनाच्या दिवशी रंगांमुळे त्वचा खराब होण्याची किंवा एलर्जी होण्याची टांगती तलवार असते. त्यामुळे अशा लोकांनी धुलिवंदनाचा आनंद  नैसर्गिक रंगांनीच घेणेअनिवार्य आहे. याशिवाय, खेळायला जाण्यापूर्वी त्वचेवर पुरेशा प्रमाणात मॉईश्चर क्रीम लावल्यास, त्वचेचे रक्षण करता येऊ शकते. त्वचातज्ज्ञ पंकज चतुर्वेदी यांनी दिलेल्या काही खास टिप्स.

* धुलिवंदन खेळायला घरातून बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण त्वचेला वॉटरप्रुफ सनस्क्रीन लावावे. जेणेकरून, सुर्याच्या किरणांपासून तुमचे संरक्षण होईल.

* रंग विकत घेताना ते नैसर्गिक आणि त्वचेला हानी पोहचवणारे नसतील, हे पाहूनच खरेदी करावेत. अगदीच सुरक्षित उपाय म्हणजे फुलांच्या पाकळ्या आणि घरच्या घरी बनविण्यात आलेले रंग वापरावेत.

* याशिवाय, संपूर्ण अंगावर मॉईश्चर किंवा तेल जास्त प्रमाणात चोपडून घ्यावे. त्यामुळे रंग अंगाला चिटकून बसणार नाहीत. जेणेकरून, नंतर अंगावरील रंग काढणे सोपे होईल.

* समजा तुमच्या अंगावर रंग टाकल्यानंतर शरीराच्या एखाद्या भागाला खाज येत असेल तर, लगेचच थंड पाण्याने तो भाग धुऊन काढावा. त्यानंतर त्वचा कोरडी करून त्वचेच्या त्या भागाला सुथिंग कॅलेमाईन लोशन लावावे. तसेच चेहरा धुण्यासाठी वारंवार फेसवॉशचा वापर करू नये.

* जर चेहऱ्यावरचा रंग निघत नसेल तर चेहरा वारंवार घासू नका. त्यामुळे त्वचा कोरडी होऊन चेहऱ्याला सुरकुत्या पडू शकतात. कोरडी झालेली त्वचा मऊ करण्यासाठी दह्याचा वापर करता येऊ शकतो.

* त्वचेवरील रंग काढण्यासाठी घरगुती उटण्याचा चांगला वापर होऊ शकतो.

* याशिवाय, दुध आणि हळद एकत्र करून तयार केलेली पेस्ट चेहऱ्याच्या नाजूक त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.