पोटाची वाढलेली चरबी कमी करणे हे एकप्रकारचे आव्हान असते. मग व्यायाम, आहार आणि इतर अनेक गोष्टींचे पालन करुन ही चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. योगासने हा यावरील आणखी एक उत्तम उपाय आहे. आता अनेक आसनांमधील नेमके कोणते आसन केल्यावर पोटावरील चरबी कमी होण्यासाठी फायदा होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अध्वासन हे विपरित शयनस्थितीतील एक आसन आहे. करायला अतिशय सोपे असल्याने तुम्ही ते सहज करु शकता.

प्रथम विपरित शयनस्थिती घ्यावी म्हणजेच पालथे झोपावे. श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकावे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने पुढे करावेत. हाताचे तळवे एकमेकांना जुळवून घ्यावेत. याचप्रमाणे पायाच्या टाचा एकमेकांना जुळवून घ्याव्यात. अंगठय़ाची नखे जमिनीला टेकलेली असावीत. नंतर हात आणि पाय दोन्ही चांगल्याप्रकारे ताणावेत व रिलॅक्स व्हावे. श्वसन संथ करावे व हळूहळू कुंभक स्थिती घ्यावी. शरीर सैल सोडावे. थोडावेळ शरीराची अशी ताणरहित अवस्था करावी. मग हळूहळू हात जागेवर न्यावेत. कपाळ उचलून हनुवटी जमिनीला टेकवावी मग सावकाश बैठकस्थितीत यावे. हे आसन करताना मनात कोणतेही विचार येणार नाहीत असा प्रयत्न केलेला चांगला.

अध्वासनामध्ये पोटावर चांगला दाब येतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. पाचकरस चांगल्याप्रकारे स्त्रवू लागतो. त्यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. हात आणि पाय ताणल्यामुळे हाता-पायाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. नोकरी करणाऱ्या महिलांनी रोज रात्री झोपताना हे आसन जरूर करावे. दिवसभर आखडलेले शरीर मोकळे होण्यास मदत होते. या आसनामुळे खांद्यानाही मजबूती येते. दिवसभर एका जागी बसून किंवा प्रवासामुळे पाठिचा त्रास होत असेल तर कण्याचे विकार बरे होऊन पाठीला चांगला आराम मिळतो. हे आसन करायला अतिशय सोपे आहे त्यामुळे वृद्ध लोकांनी कोणत्याही वयातील व्यक्ती हे आसन करु शकतो. अध्वासन हे नियमित केल्यामुळे चरबी कमी होते. प्रत्येकाने हे रोज केलेच पाहिजे असे आसन आहे. सरावाने या आसनाचा कालावधी अर्धा तासही टिकवता येतो.