फुप्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणाऱ्या लोकांपर्यंत मर्यादित राहिला नसून धूम्रपान न करणाऱ्या अनेक युवकांना हा कर्करोग होत आहे. वाढते वायू प्रदूषण याला कारणीभूत असू शकते, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

सर गंगा राम रुग्णालय येथील डॉक्टरांनी मार्च २०१२ ते जून २०१८ या काळात १५० रुग्णांचा अभ्यास केला. या वेळी जवळपास ५० टक्के रुग्ण हे धूम्रपान न करणारे होते. ५० वर्षांखालील रुग्णांमध्ये हा आकडा ७० टक्क्यांपर्यंत वाढला. यातील पाच रुग्ण २० ते ३० या वयोगटातील होते. मात्र त्यातील कोणीही धूम्रपान करीत नव्हते, असे गंगाराम रुग्णालयातील फुप्फुस शल्यविशारद अरविंद कुमार यांनी सांगितले. कमी वयाच्या आणि धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण धक्कादायक असल्याचे कुमार यांनी सांगितले.

धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होत असल्याचे सर्वज्ञात आहे, परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. १५० पैकी ११९ रुग्ण हे पुरुष होते आणि ३१ महिला होत्या. महिला रुग्णांमधील निम्म्याहून अधिक महिला या दिल्ली-एनसीआर भागातील होत्या. २० ते ८० या वयोगटातील रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला. हे रुग्ण उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, राजस्थान, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर या भागांतील होते. रुग्णांचे सरासरी वय हे ५८ होते. यातील ७४ रुग्ण हे धूम्रपान न करणारे होते, तर ७६ धूम्रपान करणारे होते.