रोज टोमॅटोची गोळी घेतल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारून हृदयविकार टाळता येतो असा दावा एका भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने केले आहे. ब्रिटनच्या संशोधकांनी टोमॅटोच्या या गोळीची चाचणी घेतली आहे. टोमॅटोतील लायकोपिन या नैसर्गिक अँटीऑक्सिडंटमुळे त्याला लाल रंग येत असतो. टोमॅटोची गोळी काहींना देण्यात आली तर ७२ प्रौढांना बनावट औषध देण्यात आले तर ज्यांनी टोमॅटोची गोळी घेतली होती त्यांच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारले. केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असलेल्या थेरानॉस्टिक्स कंपनीने ही टोमॅटो गोळी तयार केली आहे. त्यांच्या पथकाने ही गोळी परिणामकारक आहे की नाही याचा शोध घेतला. हृदयविकार असलेल्या ३६ स्वयंसेवींना व आरोग्यवान असलेल्या ३६ व्यक्तींना बनावट गोळ्या देण्यात आल्या. गोळ्यांमध्ये काय आहे हे स्वयंसेवी व्यक्तींना सांगितलेले नव्हते व संशोधकांनाही सांगण्यात आले नव्हते दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले असे बीबीसी न्यूजने म्हटले आहे.
हातातील रक्तप्रवाह हा हृदयविकाराच्या धोक्याचे निदर्शक असतो त्यामुळे काही वेळा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन किंवा त्या आकुंचित होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकारात रुग्णांना सुधारित टोमॅटो गोळी देण्यात आली असता रक्तप्रवाह सुधारला. ज्यांना बनावट गोळी देण्यात आली त्यांच्यात रक्तप्रवाह सुधारला नाही. टोमॅटोच्या गोळीने रक्तदाब, धमन्यांचा कडकपणा, रक्तवाहिन्यातील मेद यावर काही परिणाम झाला नाही. तेव्हा आता या नवीन संशोधनामुळे हृदयविकार असलेल्यांना दिलासा मिळेल.

नेहमीच्या औषधांना मात्र पर्याय नाही
डॉ. जोसेफ चेरियन हे यातील प्रमुख संशोधक असून त्यांनी म्हटले आहे की, रोज टोमॅटोची गोळी ही हृदयविकारावरील नेहमीच्या औषधांना पर्याय नाही. पूरक म्हणून या गोळ्यांचा वापर करणे शक्य आहे, या गोळीने हृदयविकार कमी होईल याची खात्री देण्यासाठी आणखी प्रयोगांची आवश्यकता आहे. पीएलओएस वन नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.