रोजच्या जेवणात मांसाहाराचा समावेश असलेल्या व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्याचबरोबर चीज जास्त खाणाऱयांनाही मधुमेह होऊ शकतो, असे फ्रान्समधील एका संशोधनात आढळून आले.
पॅरिसमधील ‘सेंटर फॉर रिसर्च इन एपिडेमिओलॉजी ऍण्ड पॉप्युलेशन हेल्थ’ यांनी फ्रान्समधील सुमारे ६० हजार महिलांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत. रोजच्या जेवणामध्ये उच्च उष्मांक असणाऱया मांसाहाराच्या समावेशामुळे संबंधित व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. पाश्चात्य आहारामध्ये मांसाहाराचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे आम्लपित्ताची पातळी वाढते. फळांचे किंवा अन्य भाजीपाल्याचे सेवन करूनही ही पातळी आटोक्यात आणली जाऊ शकत नाही. यामुळे शरीरातील इन्सुलिन निर्मितीच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता बळावते, असे संशोधनात आढळून आले.