शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारानंतर समोर आलेल्या टूलकिट प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिल्ली पोलिसांनी २१ वर्षीय पर्यावरणादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केल्यानंतर अजून दोन जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. यात मुंबईतील वकील निकीता जेकब यांच्याबरोबरच पुण्यातील इंजिनिअर (मूळ बीड जिल्ह्यातील) शंतनू मुळूक यांचाही समावेश आहे. त्यानंतर, आता दिल्ली पोलिसांनी Zoom या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपला टूलकिटबाबत झालेल्या एका बैठकीची सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे.

दिल्ली पोलिसांनी झूम या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅपकडे टूलकिटबाबत झालेल्या ऑनलाइन मीटिंगची पूर्ण माहिती मागितली आहे. 11 जानेवारी रोजी टूलकिटबाबत झालेल्या एका ऑनलाइन मिटिंगमध्ये ७० जणांनी सहभाग घेतला होता अशी माहिती आहे, त्या मिटिंगविषयीच झूमकडे माहिती मागण्यात आल्याचं समजतंय. दिल्लीत २६ जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी झूमकडे माहिती मागितली आहे.

आणखी वाचा- ‘टूलकिट’चं बीड कनेक्शन; शंतनू मुळूक यांच्या घराची झाडाझडती; कुटुंबीयांचीही चौकशी

आणखी वाचा- देशात ज्या २१ वर्षाच्या मुलीची चर्चा आहे, ती दिशा रवी कोण आहे?

दरम्यान, टूलकिट प्रकरणार मुंबईतील वकील निकीता जेकब यांच्याबरोबरच बीड जिल्ह्यातील असलेल्या शंतनू मुळूक यांचाही समावेश आहे. याप्रकरणात पोलिसांनी शंतनू यांच्या घराची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या कुटुंबीयांकडे त्याबद्दल पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं बंगळुरूतून दिशा रवी या कार्यकर्तीला अटक केल्यानंतर निकीता जेकब आणि शंतनू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं आहे. दोघांवर टूलकिट तयार केल्याचा आरोप आहे. मागील दोन दिवसांपासून दिल्ली पोलिसांची एक टीम शंतनूच्या कुटुंबियांची चौकशी करत असल्याचं वृत्त आता समोर आलं आहे. शंतनू यांनी दिल्ली पोलिसांच्या अटक वॉरंटविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केलेली आहे. सतेज जाधा हे त्यांची बाजू मांडणार आहेत. दरम्यान, बीडमधील त्यांच्या घरी पोलीस नजर ठेवून आहेत. शंतनू यांच्यावर टूलकिट तयार करण्याबरोबरच खलिस्तानवादी समर्थक गटाच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.