टूथपेस्ट आणि हात धुण्याच्या साबणांमध्ये आढळणारा एक सामान्य घटक प्रतिजैविक प्रतिरोधक जिवाणूंच्या वाढीस हातभार लावू शकतो, असे एका अभ्यासात आढळले आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील जिआनहुआ गुओ हे या अभ्यासाचे प्रमुख असून दोन हजारांहून अधिक वैयक्तिक वापराच्या प्रसाधन उत्पनांमध्ये आढळणाऱ्या ट्रायक्लोसॅन या घटकावर हा अभ्यास केंद्रित करण्यात आला होता.

प्रतिजैविकांचा अतिवापर किंवा गैरवापर केल्याने जिवाणूंमधील प्रतिरोधक क्षमता वाढत असल्याचे सर्वज्ञात आहे. परंतु रसायनांच्या वापरानेदेखील जिवाणूंमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता वाढीस लागत असल्याचे संशोधकांना समजले.

रुग्णालयासमान किंवा अधिक प्रतिजैविक प्रतिरोधक जिवाणूंची संख्या रहिवासी क्षेत्रातील सांडपाण्यामध्ये असते, असे गुओ यांनी सांगितले. त्यानंतर ट्रायक्लोसॅन यासारखी बिगर प्रतिजैविक, रसायनांमुळे प्रतिजैविक थेट प्रतिकार करू शकतात का, याबाबत आम्ही विचार करण्यास सुरुवात केली. ही रसायने दररोज मोठय़ा प्रमाणात वापरली जातात, त्यामुळे यांचे अवशेष वातावरणात पसरले जातात. ज्यामुळे विविध औषधांचा प्रतिकार केला जाऊ शकतो.

या संशोधनामुळे वैयक्तिक वापराच्या प्रसाधन उत्पादनांमध्ये आढळून येणारा ट्रायक्लोसॅन या घटकामुळे प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमतेत वाढ होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत, असे त्यांनी म्हटले.

हे संशोधक म्हणजे अशा प्रकारच्या रसायनांच्या संभाव्य प्रभावाचे पूनर्मूल्यांकन करण्याबाबतचा इशारा असल्याचे क्वीन्सलँड विद्यापीठाचे झिगुओ युआन यांनी म्हटले. एफडीआयकडून जिवाणूविरोधी सांबणांमध्ये ट्रायक्लोसॅन घटक वापरण्यास बंदी घातली आहे. इतर देशांमध्ये अशाच प्रकारच्या धोरणाचा अवलंब करण्यात आला आहे का, याबाबत स्पष्ट पुरावे समोर येऊ शकले नसल्याचे युआन यांनी सांगितले.