नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही सर्व सज्ज झाला असाल. तुमच्यापैकी बहुतेकांना आपल्या कुटुंबियांसोबत नववर्ष साजरे करावयाचे असेल तर काहींची हाऊस पार्टीची तयारी सुरू असेल. आपल्या घरी जर नववर्षाची तुम्ही पार्टी देणार असाल तर काही ती केवळ खाण्या-पिण्या पुरती मर्यादित न ठेवता तिच्या कक्षा रुंदाविण्याकरिता येथे काही ‘पार्टी आइडियाज’ देण्यात येत आहेत. यांची अंमलबजावणी केल्यास तुमची पार्टी नक्कीच स्मरणात राहील.

पार्टीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पार्टी ही मनोरंजन प्रधान हवी. जर तुम्ही पार्टीची एखादी थीम ठरवली तर सजावट, जेवण, खेळ याबाबत तुम्ही मोकळेपणाने विचार करू शकाल, थीम पार्टीसाठी आधी तुमच्या पाहुण्यांना विश्वासात घ्या आणि मगच त्याचे नियोजन करा.

उदाहरणार्थः पूर्ण घराची सजावट ८० च्या दशकातील बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे करावी. घरामध्ये त्या काळातील चित्रपटांचे पोस्टर्स लावावेत आणि त्याच काळातील संगीतही लावा. म्हणजे वातावरण देखील निर्माण होईल.

या व्यतिरिक्त तुम्ही काऊबॉइज थिम देखील ठेऊ शकतात. घरामध्ये एका कोपऱ्यात तुम्ही तुमचा बार किंवा ज्यूस बार ठेऊ शकता आणि ज्या प्रमाणे वेस्टर्न चित्रपटात ड्रिंक्स सर्व्ह केले जातात त्याप्रमाणे तुम्ही ते सर्व्ह करू शकता. तसेच, त्याच थीमचे गेम्सदेखील खेळता येऊ शकतात.

जेवण आणि ड्रिंक्स- तुमच्या आणि तुमच्या पाहुण्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे तुम्ही ही व्यवस्था करू शकता. परंतु, न विसरता न्यू इयर केक घेऊन या. वर्षाचा पहिला केक तुमच्याकडून होतो याची सर्वांना आठवण राहील.

खेळ- नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी ३१ डिसेंबर केवळ तुम्हाला खाण्या-पिण्यात घालवावा असे नक्कीच वाटणार नाही तेव्हा काही फन गेम्स तुम्ही खेळू शकता. ट्रुथ अॅंड डेअर, डम्ब शराड्स किंवा अंताक्षरी हे नेहमीचे परंतु हमखास मनोरंजन करणारे खेळ आहेत. अंताक्षरी खेळताना ती फार एकसुरी होते असा अनुभव असतो. तेव्हा एखादी विशिष्ट थीम ठेऊन अंताक्षरी खेळा जसं की केवळ २००० नंतर आलेली गाणी म्हणायची किंवा केवळ ९० च्या दशकातील गाणी म्हणायची. किंवा एखादा असा शब्द निवडावा आणि तो शब्द किंवा विषय ज्या गाण्यामध्ये आहे तीच गाणी म्हणायची, असे जर खेळला तर पार्टी एकसुरी न होता वैशिष्ट्यपूर्ण होईल.

एका बाउलमध्ये सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या आणि दुसऱ्या बाउलमध्ये कृती असे ठेवावे. त्यानुसार एका बाउलमधून नाव आणि दुसऱ्या बाउलमधून त्यांनी काय करावयाची कृती निवडावी. त्यानुसार तुम्ही त्यांना सूचना देऊन खेळ खेळू शकता.
हाऊजी – नवीन वर्षाला थोडे पैसे कमावण्याची संधी जर तुमच्या पाहुण्यांना दिली तर? त्यासाठी बाजारात हाऊजी हा गेम मिळतो. त्यावर लिहिलेल्या सूचनांप्रमाणे हा खेळ खेळून नवे वर्ष साजरे करता येऊ शकते.