रोजच्या रटाळ आयुष्यातून उसंत मिळताच अनेतजण फिरस्तीवर निघण्याचा बेत आखतात. काही जण ही उसंत कधी आणि कशी मिळवायच्या प्रयत्नात असतेवेळीच काही जण मात्र फिरण्यासाठीची त्यांची बकेट लिस्ट अपडेट करत राहता. नवनवीन ठिकाणांना भेट देण्यासाठीच्या या यादीत कितीही नव्या ठिकाणांची जोड मिळाली तरीही एका ठिकाणाचं स्थान मात्र कायम असतं. ते ठिकाण म्हणजे लेह लडाख.

लेह लडाख…. असे शब्द जरी उच्चारले तरी आपण एका वेगळ्याच दुनियेत जातो. एक अशी दुनिया जिथे मोबाईल नेटव्हर्क नसतानाही आपल्या विचारांचा मोबाईल सुरुच असतो. ज्यामध्ये लॉगईन असणाऱ्या एखाद्या सोशल नेटव्हर्किंग साइटवर आपण त्या ठिकाणच्या आठवणी पोस्ट करत असतो अर्थात त्या आपल्या मनात साठवत असतो. जगण्याचा आनंद देणारी निसर्गयात्रा, निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली उधळण अनुभवण्यासाठी आयुष्यात एकदातरी या ठिकाणाला भेट देण्याचा प्रत्येकाचाच मानस असतो. पण, लडाखच का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा विचार तुम्ही कधी केलाय का? लडाखला जाण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात. यामधूनच अशा काही कारणांवर आता आपण नजर टाकणार आहोत, ज्यामुळे बहुतांश पावलं या ठिकाणाकडे वळतात….

ट्रेकिंग-
ट्रेकिंगच्या वळणवाटांवर निघालेल्या अनेकांसाठी लडाख म्हणजे एप परवणीच. इथे असणाऱ्या नब्रा व्हॅलीमध्ये आणि इतर पर्वतरांगांमध्ये ट्रेकर्सना मनमुराद आनंद लुटता येतो. मर्खा व्हॅली, श्योक व्हॅली, त्योकांगिरी आणि लामायुरु या ठिकाणांकडे ट्रेकर्सचा सर्वाधिक कल असतो.

राफ्टिंग-
लडाखमध्ये निसर्गसौंदर्यासोबतच तुम्ही काही थरारक अनुभवही घेऊ शकता. डोंगररांगांमधून वाहण्याऱ्या नदीच्या प्रवाहातून रिव्हर राफ्टिंग करण्यासाठीसुद्धा अनेकांचेच पाय लडाखकडे वळतात. राफ्टिंग करत असताना वातावरणात असणारी वेगळीच सकारात्मक उर्जाही यावेळी अनेकांनाच अनुभवता येते.

लेक-
जणूकाही एका काल्पनिक चित्रामध्येच आपण वावरत असल्याचा भास लडाखमधील लेक पाहून येतो. लेक अर्थात तलाव आणि त्यामागे असणाऱ्या डोंगररांगा, स्वच्छ प्रकाश आणि निरभ्र आकाश या सर्व गोष्टी लडाखमध्ये येण्यासाठी अनेकांनाच प्रवृत्त करतात. इथे येणाऱ्या अनेकांचच आवडीचं ठिकाण म्हणजे पॅंगाँग लेक. समुद्रसपाटीपासून साधारण ४००० फूट उंचीवर असणाऱ्या या लेकच्या सभोवताली वावरताना आपण, एका वेगळ्याच जगात आल्याची अनुभूती तिथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला होते.

मॉनेस्ट्री-
कोणत्यातरी साहसाच्या शोधात असणाऱ्यांसाठीच लडाखच्या वाटा उभ्या आहेत असं नाही. तर इथे मनशांतिसाठी येणाऱ्यांची संख्याही तुलनेने जास्त आहे. लडाखमधील मॉनेस्ट्री आणि तेथे असणारे भव्य स्तूप जगाच्या नकाशावरही बरेच प्रसिद्ध असून असंख्य पर्यटकांचं लक्ष वेधत आहेत.

मॉनेस्टीक फेस्टिव्हल्स-
फक्त पर्यटनासाठीच नव्हे, तर वविध फेस्टिव्हल्ससाठीसुद्धा लडाखची वेगळी ओळख आहे. पृथ्वीवर असणाऱ्या या सुरेख आणि नयनरम्य ठिकाणावर ऐन थंडीच्या आणि वरदळीच्या मोसमात थिक्सी, शर्मी, स्पितुक आणि माथो या ठिकाणांवर आयोजित करण्यात येणारे विविध महोत्सव पर्यटकांसाठी परवणी ठरतात.