नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोकडविरहित व्यवहारांसाठी ग्राहकांची Paytm ला मोठ्या प्रमाणात पसंती मिळली. अल्पावधीतच हे अॅप वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली, त्यामुळे नोटाबंदीच्या काळात सर्वात मोठा फायदा पेटीएमला झाला होता. रोकडविरहित व्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अॅपने आता युजर्ससाठी नवं फीचर आणलं आहे. या फीचरमुळे पेटीएम वापरणाऱ्या युजर्सना चॅटिंगदेखील करता येणार आहे.

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप रोकडविरहित व्यवहारांसाठी फीचर आणणार अशी चर्चा होती. नव्या उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी व्हॉट्सअॅप अशाप्रकारचं फीचर आणणार होतं ही चर्चा सुरू असतानाच पेटीएमनं आपलं चॅटिंग फीचर अपडेट करून व्हॉट्सअॅपला दणका दिला. ‘इनबॉक्स’ असं या फीचरचं नाव असून सध्या अॅंड्राईडवर ते उपलब्ध आहे.

ओप्पोचा हा सेल्फी एक्स्पर्ट फोन पाहिलात का?

यामुळे व्यवहार करताना युजर्स एकमेकांशी चाट करू शकतात. फोटो, व्हिडिओदेखील पाठवू शकतात. हे फीचर पूर्णपणे सुरक्षित असून, युजर्समध्ये व्यवहारांसंदर्भात काही बोलणं झालं तर ते गोपनीय राहिलं अशी माहिती पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक अबॉट यांनी दिली. पेटीएमवरून व्यवहार करताना समोरच्या व्यक्तींशी संवाद साधताना नेहमी युजर्सला इतर मेसेजिंग अॅपचा वापर करावा लागायचा, त्यामुळे ‘इनबॉक्स’ फीचरमुळे ग्राहकांची ती अडचणदेखील दूर झाली आहे असंही अबॉट म्हणाले.

पेटीएम अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार या अॅपचे २७ कोटींहून अधिक युजर्स आहेत, या फीचरच्या येण्यामुळे व्हॉट्स अॅपवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर वापराताय? मग हे वाचा