ऑटोमोबाइल क्षेत्रातील मंदीमुळे या क्षेत्रासाठी वर्ष 2019 चांगलं ठरलं नाही, पण तरीही अनेक नव्या कार भारतीय रस्त्यांवर आल्या. यावर्षी भारतीय बाजारात अनेक नव्या SUV कार लाँच झाल्यात. यामध्ये महिंद्रा, ह्युंदाई आणि टाटा यांसारख्या कंपन्यांशिवाय किया आणि एमजी यांसारख्या नव्या कंपन्यांच्या एसयुव्ही गाड्यांचाही समावेश आहे. जाणून घेऊया 2019 मध्ये लाँच झालेल्या आठ शानदार एसयुव्ही कार्सबाबत…

– टाटा हॅरियर
ओमेगा प्लॅटफॉर्मवर बनविलेल्या टाटाच्या हॅरिअरचे जानेवारीमध्ये पदार्पण झाले. या कारमध्ये 2.0 लिटरचे चार सिलेंडर टबरेचाज्र्ड डिजल इंजिन असून 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे. इको, सिटी आणि स्पोर्ट हे तीन ड्राइव्हिंग मोड्स आहेत. वर्षभरात 13 हजार 769 कारची विक्री झाली आहे. हॅरिअरची स्पर्धा एमजीच्या हेक्टर व ह्य़ुंदाईच्या केट्राबरोबर आहे. हॅरियरच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 13 लाखांच्या घरात आहे.

– मारुती एस प्रेसो
मारुती सुझुकीने एसयूव्ही प्रकारातील वाहनांना मिळत असलेली पसंती पाहता एसयूव्ही प्रकारातील नव्हे पण एसयूव्हीसारखी असणारी मिनी एसयूव्ही ‘एस प्रेसो’ सप्टेंबरमध्ये बाजारात आणली. गेल्या तीन महिन्यांत सुमारे 26 हजार 860 कारची विक्री झाली आहे. या कारमध्ये ऑल्टो के 10 चे 1.0- लिटर बीएस 6 इंजिन आहे. या कारची तुलना रेनो क्विड फेसलिफ्टबरोबर असून परवडणारी एसयूव्ही म्हणून खरेदीदार तिच्याकडे पाहत आहेत. 3.69 लाख रुपये इतकी बेसिक व्हेरिअंटची किंमत आहे.

– निसान किक्स
जानेवारी 2019 मध्ये निसानने किक्स एसयुव्ही भारतीय बाजारात उतरवली. या कारची किंमत 9.55 लाख ते 13.69 लाख रुपयांदरम्यान आहे. किक्स पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. यात एक 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 106hp ची ऊर्जा आणि 142Nm टॉर्क निर्माण करते. तर, डिझेल इंजिनही 1.5 लिटरचं असून 110hp ऊर्जा आणि 240Nm टॉर्क निर्माण करते.

– महिंद्रा एक्सयूवी300
महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने जानेवारीत एक्सयूव्ही 300 ही मिनी एसयूव्ही बाजारात आणली. आतापर्यंत 33 हजार 581 कारची विक्री झाली आहे. 8.30 ते 12.69 लाखापर्यंत ही कार उपलब्ध आहे. पेट्रोल-डिझेल पॉवरफुल इंजिन पर्यायांसह सहा गिअर आहेत. सन रुफटॉप, दोन ते सात एअर बॅग यांच्यासह महत्त्वाचे म्हणजे टायरची स्थिती काय आहे हे गाडी चालू करण्यापूर्वी आपल्याला समजू शकते. त्यामुळे अपघाताचा धोका टळतो. आरामदायी अशी मोटार आहे.

– ह्य़ुंदाई व्हेन्यू

मे महिन्यात बाजारात आलेली ह्य़ुंदाईची व्हेन्यू ही कारही खरेदीदारांच्या पसंतीस उतरली आहे. कोरिया कार उत्पादक कंपनीची ही भारतातील पहिली मध्यम आकारातील एसयूव्ही प्रकारातील कार. आतापर्यंत 60 हजार 922 कारची विक्री झाली आहे. भारतातील मारुतीच्या विटेरा ब्रेजा, टाटाची नेक्सॉन, महिंद्राच्या एक्सयूव्ही 300 बरोबर तिची स्पर्धा आहे. तीन इंजिन पर्याय असून यात 1.0 लिटर टबरेचाज्र्ड पेट्रोल इंजिन, 1.2 लिटर पेट्रोल इंजिन व 1.4 लिटर टर्बेचाज्र्ड डिजल इंजिन आहे. 6.50 लाख इतकी या कारच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत आहे.

– एमजी हेक्टर
बोलती कार म्हणून भारतीय बाजारात जुलैमध्ये आगमन झालेल्या मॉरिस गॅरेजेसच्या हेक्टरनेही आपला पसंतीक्रम राखून ठेवला आहे. आतापर्यंत 12 हजार 909 कारची विक्री झाली आहे. एमजी हेक्टर ही भारतातील पहिली इंटरनेट कार असून तिची बोलती कार असा लौकिक आहे. दहा इंचांचा डिस्प्ले असून इनबिल्ट सिम दिलेले आहे. 4जी, 5जीसोबत लिंक करता येऊ शकते. मोबाइल कॉलही जोडतो येतो. ‘ई-मेल’ही पाहू शकतो व काही फाइल जतनही करू शकतो. व्हॉइस कमांडवर 100 पर्यंत चालक गाडीला सूचना करू शकतो. चारी बाजून कॅमेरे आहेत. तिची किंमत 12 ते 16 लाखांपर्यंत असून तरुण वर्गाला ती आकर्षित करीत आहे.

– जीप कंपस ट्रेलहॉक
जीपने जून महिन्यात ऑफ-रोड एसयुव्ही कंपस ट्रेलहॉक लाँच केली. जीप कंपस ट्रेलहॉकमध्ये 2.0-लिटर, 4-सिलिंडर, टर्बो डिझेल इंजिन असून हे इंजिन 170.63 bhp ऊर्जा आणि 350Nm टॉर्क निर्माण करतं. 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या कंपस ट्रेलहॉकची किंमत 26.80 लाखांपासून सुरू होते.

आणखी वाचा – MG मोटरची नवीन इलेक्ट्रिक SUV, एका चार्जिंगमध्ये 340 किमीचा प्रवास

– किया सेल्टॉस
सध्या भारतीय वाहन बाजारात ‘किआ’च्या सेल्टोसने खरेदीदारांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केलेले दिसत आहे. भारतात जूनमध्ये या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे अनावरण करण्यात आले. बुकिंग सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी सेल्टोसची ६ हजार युनिट नोंदणी झाली होती. आतापर्यंत 40 हजार 849 कार विक्री झाल्या आहेत. ह्य़ुंदाईच्या क्रेटा व एमजीच्या हेक्टरशी या कारची तुलना केली जात आहे. दिसायला आकर्षक तर आहेच, शिवाय एअर प्युरिफायर आणि वेंटिलेटेड सीट्स या काही नवीन सुविधाही देण्यात आल्या आहेत. तीन इंजिन पर्याय मिळतात. इंजिनास स्वयंचलित 6 गिअरबॉक्स आहेत. किंमत 10 लाख ते 15 लाखांपर्यंत आहे. जानेवारीपासून या कारची किंमत वाढणार आहे.